गणेशोत्सव आटोपल्यानंतर आता पितृ पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. या पितृ पंधरवड्यावरून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय प्रश्न विचारतील? अशी विचारणा करत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. पुढच्या पिढीने केलेले तर्पण स्वीकारून आशीर्वाद देऊन पितरांचे आत्मे परत जातात, अशी यामागील भावना आहे. पण असे दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?
त्यापैकी एक उद्विग्न आत्मा मानसपुत्र शरद पवारांना विचारेल की, “वसंतदादांच सरकार खंजीर खुपसून पाडल्यानंतर सुरू केलेला पाडापाडी घरफोडीचा खेळ कधी थांबवणार?, किती घरे फोडली किती पक्ष फोडले हे लक्षात तरी आहे का? असे प्रश्न करत केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
तर पुढे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना त्यांनी लिहिलं की, तर एक अस्वस्थ आत्मा उद्धव ठाकरेंना उद्विग्नपणे विचारेल की, माझा हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसचे अंकित होताना थोडासुद्धा विचार केला नाही का?, हिंदुह्रदयसम्राट म्हणून मला अख्खं जग ओळखते, तिथे जनाब बालासाब ऐकताना कान झडले कसे नाहीत?, भजन,भारूडांनी भरगच्च असलेली आपली समृद्ध मराठी गंगा असताना अजान स्पर्धा भरवताना मराठीपण कुठे विकले?, असा टोला उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आता भाजपाने केलेल्या या टीकेला शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.