युती न झाल्यास शिवसेनेची कोंडी
By Admin | Updated: October 7, 2015 02:08 IST2015-10-07T02:08:27+5:302015-10-07T02:08:27+5:30
केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली तर दोन्ही पक्ष साधारणत: ९०-९५ जागा मिळवू शकतात. परंतु, ती झाली नाही तर मात्र, भाजपापेक्षाही त्याचा

युती न झाल्यास शिवसेनेची कोंडी
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली तर दोन्ही पक्ष साधारणत: ९०-९५ जागा मिळवू शकतात. परंतु, ती झाली नाही तर मात्र, भाजपापेक्षाही त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेची कोंडी जास्ती होणार आहे. त्याउलट भाजपाकडे सद्य:स्थितीला केवळ ९ नगरसेवक असल्याने गमवण्यासारखे काहीही नाही. शिवसेनेकडे सध्यातरी शिंदे पिता-पुत्र, एक आमदार रिंगणात असून भाजपाकडे मात्र ४ आमदार आणि
१ खासदार अशी तगडी फळी आहे. त्यामुळे तुलनेने भाजपाकडे प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पर्याय आहे.
असे असले तरीही भाजपाच्या कल्याण पश्चिमेसह डोंबिवलीतील आमदारांवर मात्र निवडणुकीत युती होवो न होवो परंतु, अधिकाधिक जागांवर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आहे. त्यावर त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
या दोघांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जास्तीतजास्त नगरसेवक फोडून जे वॉर्ड त्यांचे होते ते भाजपाकडे वळवण्यात आमदार किसन कथोरे कस लावत आहेत. यातून ते स्वत:चे वेगळेपण मुख्यमंत्र्यांना सिद्ध करण्यासाठी दंग आहेत. तर कल्याण पूर्वेतून आमदार गणपत गायकवाड स्वत:चे अस्तित्व टिकवून मुख्यमंत्र्यांकडून काहीना काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या मनसुब्यात आहेत.
अशा सर्व परिस्थितीत भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनाही या चारही जणांवर वॉच ठेवून आगरी कार्ड वापरून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत शुभसंदेश देण्यासाठी त्यांनी विकास परिषदेच्या व्यासपीठावर उघडउघडपणे शिवसेनेच्या खासदारावर टीका करून त्यांना अंगावर घेतले होते, हे सर्वांनाच ठावुक आहे.
सेनेकडूनही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांच्या मुलाखतींदरम्यान भाजपाच्या नेत्यांना नाव न घेता टोमणा मारला होता. तसेच कपिल पाटील यांच्या भाषणाचाही सेनेच्या खासदारांनी खरपूस समाचार घेतला होता. अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर कुरघोडीचे राजकारण युतीत दिसून येत असल्याने वरिष्ठांच्या मर्जीनुसार जरी युती झाली तरीही ती येथील कार्यकर्त्यांना नको आहे. तर युती झाल्यास ९५ प्लस अशी परिस्थिती असेल.
त्यामुळेच दोन्ही पक्षांनी मुलाखतींदरम्यान सर्व जागांसाठीच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर जुन्या कार्यकर्त्यांनी मतदारांची द्विधा अवस्था होणार असल्याने युती झालेली बरी असा आग्रह धरला आहे.
युती झाल्यास ९५ प्लस कल्याणमध्ये सेना-भाजपात तगडी स्पर्धा
- युती झाल्यास भाजपाच्या पारड्यात ३५-४५ जागा मिळतील तर सेनेच्या पारड्यात ५०-५५ जागा मिळतील असा त्या पक्षांच्या नेत्यांना
विश्वास आहे. युती न झाल्यास शिवसेनेला डोंबिवलीतून फटका बसू शकतो, तर कल्याणमधून शिवसेना-भाजपामध्ये तगडी फाईट होऊ शकते. ग्रामीणचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही.
- भाजपाच्या दृष्टीने डोंबिवली पश्चिम ७, पूर्व १२-१५, कल्याण पूर्व-६-८, पश्चिम(मोहना-टिटवाळापर्यंत) २०हून अधिक तसेच ग्रामीणमधूनही चांगले यश मिळेल असे सांगण्यात येत आहे. शिवसेना मात्र असा कोणताही अंदाज वर्तवत नसून डोंबिवलीत बसणारा फटका कसा कमी करता येईल आणि ग्रामीणमधून संघर्ष समितीचा रोष कमी करून कसे जास्तीतजास्त यश
मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करत आहे.
- यावरून भाजपा ९पेक्षा जास्त यश मिळवू शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात तणाव असून, नेमके काय करावे हा पेच आहे. दोन्ही पक्षांना बंडाळी थांबवतांना प्रचंड मनस्ताप होणार आहे. एकेका वॉर्डातून नको तेवढे इच्छुक असून, सर्वांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे ज्याला त्याला उमेदवारीची अपेक्षा आहे. ती पूर्ण न झाल्यास संबंधित पक्षांना त्याचा त्रास होणार असून, कदाचित त्याचा फायदाच काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसेला होऊ शकतो. अथवा अपक्षांचीही वर्णी लागू शकते, असेही अभ्यासक सांगतात.