Girish Mahajan: बारामती विमानतळ परिसरात झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घाईने घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "अजित पवार जाऊन केवळ चार दिवस झाले आहेत, अशा परिस्थितीत शपथविधीचा निर्णय घेणे ही खरोखरच घाई वाटते. मात्र, यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात किंवा पक्षाची एखादी राजकीय रणनीती असू शकते. राष्ट्रवादीने हा निर्णय का घेतला, यावर मी जास्त भाष्य करणार नाही, पण मी स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे."
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
अजित पवार गटाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाशी असलेले अंतर वाढणार की दोन्ही गट एकत्र येणार, यावरही महाजनांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. "राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरी भाजपला त्यामध्ये काहीही अडचण नाही. उलट ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. ते एकत्र आले नाहीत तरी अजित पवार यांचा गट सध्या आमच्यासोबत सत्तेत आहेच. तो पूर्णपणे पवार कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे," असे त्यांनी नमूद केले.
शरद पवारांना आमंत्रण का नाही?
शपथविधीबाबत शरद पवारांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यावर महाजन म्हणाले की, "जर दोन्ही गट एकत्र होण्यासारखं काही असतं तर शरद पवारांना नक्कीच आमंत्रण गेले असते. हा कार्यक्रम घाईगडबडीत आणि अत्यंत छोटेखानी स्वरूपात आयोजित केला आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात नक्की काय सुरु, याची कल्पना बाहेर कोणालाही नाही."
दरम्यान, अजित पवारांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या त्या विमान अपघाताची सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. काल बारामतीत विधी सुरू असतानाच सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर कोणत्याही कौटुंबिक चर्चेविना सुनेत्रा पवार थेट मुंबईत दाखल झाल्या. आज संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या आमदारांच्या बैठकीनंतर लगेचच त्यांचा लोकभवनावर उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार आहे.
Web Summary : Girish Mahajan suggests Sharad Pawar wasn't invited to Sunetra Pawar's oath due to hurried arrangements. He noted BJP's openness to NCP factions uniting, emphasizing Ajit Pawar's group remains aligned regardless. The decision behind Sunetra's swift appointment remains within NCP's internal affairs.
Web Summary : गिरीश महाजन ने बताया कि शरद पवार को सुनेत्रा पवार के शपथ ग्रहण में जल्दबाजी के कारण आमंत्रित नहीं किया गया। उन्होंने कहा कि भाजपा एनसीपी गुटों के एक होने के लिए तैयार है, और अजित पवार का गुट हमेशा गठबंधन में रहेगा। सुनेत्रा की नियुक्ति एनसीपी का अंदरूनी मामला है।