Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दिसणार असल्याचे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार आले असते, असं संजय गायकवाड म्हणाले.
हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारला धारेवर धरुन निर्णय मागे घ्यायला लावणाऱ्या ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळाला साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे २० वर्षांनी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मराठीच्या मु्द्द्यावरुन ठाकरे बंधूंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. या मेळाव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही - संजय गायकवाड
"पंधरा वर्षे आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात फार पडत पडेल असे वाटत नाही. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता आणि किती लोकांचे काम करता याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असतात तर बाळासाहेब जिवंत असताना २८८ आमदार निवडून आले असते. बाळासाहेब असताना पण आपण ७० ते ७४ आमदारांच्या पुढे कधी गेलेलो नाही," असं विधान संजय गायकवाड यांनी केले.
दहशतवाद ओळखायचा असेल तर उर्दू भाषा आली पाहिजे
"विषय फक्त हिंदीचा नाही. जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले. ते मुर्ख होते का? तसेच छत्रपती शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे," असंही संजय गायकवाड म्हणाले.