रात्री कुणी गेलं की काळजात होतं धस्स!
By Admin | Updated: August 5, 2016 23:45 IST2016-08-05T23:40:49+5:302016-08-05T23:45:42+5:30
कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स होतंय.
222_ns.jpg)
रात्री कुणी गेलं की काळजात होतं धस्स!
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 5 - कृष्णेच्या पुराने माहुलीच्या कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स् होतंय. कारण सकाळ होईपर्यंत नातलगाचा मृतदेह घरातच ठेवण्याची पाळी या पुरानं आणलीय.
महाबळेश्वर, वाई तालुक्यांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढत होत आहे. त्यामुळे माहुलीतील कैलास स्मशानभूमीत पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याने रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर पर्याय म्हणून मृतदेह रात्रभर शीतपेटीत ठेवण्याचा पर्याय दिला आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीचा काही भाग पाण्याखाली गेला होता. पाणी कमी झाले असले तरी पाणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यापुढे रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही त्या-त्या दिवसाच्या पाणी पातळीनुसार रात्री स्मशानभूमी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिली आहे.
कैलास स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी १४ अग्निकुंड आहेत. त्यापैकी आठ नदीपात्रालगत तर सहा बंदिस्त आहेत. नदीला पाणी वाढल्याने आठही अग्निकुंड पाण्याखाली जातात. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे. रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मृतदेह ठेवण्यासाठी शहरात दोन ठिकाणी शव शीतपेटी भाडेतत्त्वावर उपलब्ध असल्याची माहिती मृताच्या नातेवाइकांना दिली जात आहे.
रात्री चिता अर्धवटच जळाली.. अखेर सकाळी विधी
दोन दिवसांपूर्वी माहुलीच्या स्मशानभूमीत रात्री दहा वाजता एका कुटुंबाने चिता पेटविली. आगीच्या ज्वाळा धडाडल्यानंतर नातेवाईक घरी गेले. मात्र, नंतरच्या तुफान पावसामुळे चिता अर्धवटच जळाली. तेव्हा, स्मशानभूमीतील संबंधित कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांशी मोबाइलवरुन संपर्क साधला. मात्र, अशा प्रचंड पावसात मध्यरात्री येणे शक्य नसल्याने नातेवाईक सकाळीच स्मशानभूमीत आले. पुन्हा एकदा सर्व विधी पार पाडून ही चिता पेटविण्यात आली. हा कटू अनुभव ध्यानात घेऊनच पूर ओसरेपर्यंत रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत अंत्यसंस्कार थांबवण्याचा निर्णय स्मशानभूमी व्यवस्थापनाने घेतलाय. गेल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत पावसामुळे रात्रीचे अंत्यसंस्कार स्थगित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संततधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होत आहे. अंत्यविधी व्यवस्थित होण्यासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत धोम आणि कऱ्हेर धरणांतील अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन रात्री उपलब्ध अग्निकुंडात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात आहे.
- राजेंद्र चोरगे, संस्थापक,
बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट