मुस्लिमांनी ठरवल्यासच दहशतवादाचा नायनाट
By Admin | Updated: January 13, 2015 04:55 IST2015-01-13T04:55:17+5:302015-01-13T04:55:17+5:30
भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल

मुस्लिमांनी ठरवल्यासच दहशतवादाचा नायनाट
नाशिक : भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक
गुरू श्री श्री रविशंकर यांनी येथे ‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले, सध्या दहशतवादामुळे सगळे जग त्रस्त आहे. पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्याविरोधात हजारो लोक जमले होते. दहशतवाद समूळ नष्ट करायचा असल्यास भारत व इंडोनेशिया या दोन मुस्लिमबहुल देशांतील मुस्लिमांना तसा निश्चय करायला हवा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणावर चिंता व्यक्त करीत केंद्र व राज्यातील नवे सरकार नद्यांच्या स्वच्छतेत पुढाकार घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संगीत, साहित्य, आयुर्वेद या बाबी म्हणजेच भारतीय संस्कृती असून, तरुणाईने देशाच्या संस्कृतीचा सन्मान न केल्यास भारत नष्ट होईल, असे ते म्हणाले.
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचे प्रस्थ वाढते आहे का, या प्रश्नावर रविशंकर यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. ते म्हणाले, हिंदुत्ववादी नेते आधीही होते आणि आताही आहेत. त्यांच्याशी केंद्र सरकारचे काही देणेघेणे नाही. अध्यात्मातूनच राजकारणाची स्वच्छता होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)