Maharashtra latest News: 'मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते', असं विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. जुनी उदाहरणे देत त्यांनी कारणही सांगितले. याचवेळी शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल खदखद व्यक्त केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदाबद्दल हे विधान केले.
ठाकरेंमुळे शिवसेना मागे गेली -पाटील
शिवसेनेबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, "गंगेचा उगम पवित्र आहे कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तिचा उगम झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे गेली. सोलापूर जिल्ह्यात पक्षाची सूत्रे दुसऱ्याकडे गेल्यामुळे शिवसेनेची पिछेहाट झाली."
वाचा >>“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
'...तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते'
मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही. मी निवडून यायला पाहिजे होतो. मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. कारण मी १९९५ ला निवडून आलो, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी २०१९ मध्ये निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले."
'उद्धव ठाकरेंच्या हाताला आयोडेक्स लावायची वेळ आली होती'
"माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो, मला माहिती नाही.राज्यातील लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात एकनाथ शिंदेंनी खूप कष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्राचा निकाल लागला. शरद पवारांसारख्या माणसाचे फक्त १० लोक निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. पण, त्यांना काही यश मिळाले नाही", असे खोचक भाष्य शहाजीबापू पाटील यांनी केले.