'मुख्यमंत्र्यांना पटलं तर पालकमंत्री बदलतील', भुजबळांनी सुहास कांदेंचे आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:40 PM2021-09-30T17:40:18+5:302021-09-30T17:41:51+5:30

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

'If the Chief Minister agrees, the Guardian Minister will change', Chhagan Bhujbal refuted Suhas Kande's allegations | 'मुख्यमंत्र्यांना पटलं तर पालकमंत्री बदलतील', भुजबळांनी सुहास कांदेंचे आरोप फेटाळले

'मुख्यमंत्र्यांना पटलं तर पालकमंत्री बदलतील', भुजबळांनी सुहास कांदेंचे आरोप फेटाळले

googlenewsNext

नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

गुरुवारी छगन भुजबळ यांनाही पत्रकार परिषद घेतली. यावेळी नांदगावला 45 कोटी निधी दिला. या वर्षीचा निधी कोरोनासाठी वापरा हे सरकारचे निर्देश होते. निधी वाटप हा जिल्हाधिकारी समितीने घेतला आहे. मी निधी वाटतो हा सुहार कांदे यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील, असे छगन भुजबळ म्हणाले.

याचबरोबर,  असे आरोप महाविकास आघाडी असताना करणे योग्य नाही. मी सुहास कांदे यांना सहकार्य करणार. मी कोणालाही धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो. हा भुजबळ विरुद्ध शिवसेना संघर्ष नाही. सुहास कांदे शिवसेनेचे म्हणून शिवसेना नेते त्यांच्यासोबत असावेत. निवडणूक आली की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आणि शेवटी जनता ठरवेल कोण योग्य, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांना राहिला नाही, यांनाच का? असा सवालही करत माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

'निधी वाटपाचा अधिकार भुजबळांना नाहीच'
दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद म्हटले की, छगन भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचे भांडण नाही. 12 कोटी निधी आला. यातील 10 कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला. त्यांचे पालकमंत्रिपद काढावे ही मागणी आहे. छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. माझ्याजवळ त्याचे पुरावे आहेत. हे पुरावे मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना सादर केले आहेत. मी त्यांच्यासोबत कधीही चर्चेला येण्यासाठी तयार आहे. भाजीपाला विकणारे भुजबळ,25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवालही यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

आमदार सुहास कांदे यांना धमकी 
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली. सुहास कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे. सोमवारी (दि.२७) कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संशयित अक्षय निकाळजे नावाच्या व्यक्तीने फोन केला. यावेळी त्याने ‘मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जे रिट पिटिशन दाखल केलेले आहे, ते कोर्टातून काढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियांसाठी चांगले होणार नाही...’ अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे.

Web Title: 'If the Chief Minister agrees, the Guardian Minister will change', Chhagan Bhujbal refuted Suhas Kande's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.