इचलकरंजीचे वीस दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगेत
By Admin | Updated: June 4, 2015 00:58 IST2015-06-04T00:56:03+5:302015-06-04T00:58:00+5:30
नदी प्रदूषण : दहा दशलक्ष लिटर औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेनंतर शेती सिंचनास

इचलकरंजीचे वीस दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगेत
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयाने सुचविलेल्या औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी पुढे शेती सिंचनासाठी दिले असले, तरी काळा ओढा व चंदूर नाला येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे सुमारे २० दशलक्ष लिटर सांडपाणी नाल्यांतून पंचगंगा नदीत मिसळतच आहे.
शहरास दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. त्यापैकी ३० दशलक्ष लिटर सांडपाणी गटार व भुयारी गटारात जाते. याशिवाय शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कूपनलिकांचे दहा दशलक्ष लिटर सांडपाणीसुद्धा गटारात येते. अशा ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर नगरपालिकेच्या आसरानगर येथील एसटीपी प्रकल्पात प्रक्रिया होते. यातून प्रक्रिया केलेले पाणी पुढे टाकवडे आणि यड्राव गावातील शेती सिंचनासाठी दिले जाते.
शहरातील प्रोसेसर्समधून निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया केली जाते. हे सांडपाणी पुढील प्रक्रियेसाठी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास (सीईटीपी) दिले जाते. असे सीईटीपीतील दहा दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाणी पुढे शेती सिंचनासाठी पाठविले जात आहे. मात्र, शहरातील ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी २० दशलक्ष लिटर पाण्यावरच प्रक्रिया होते. उर्वरित २० दशलक्ष लिटर पाणी सध्याही शहरालगतच्या काळा ओढा व चंदूर नाल्यातून नदीत मिसळत आहे. (प्रतिनिधी)
अन्यथा प्रोसेसर्स कारखाने बंद ठेवावेत
२०१२ मध्ये आलेल्या काविळीच्या साथीनंतर नदी प्रदूषणासंदर्भात इचलकरंजीतील कामगार नेते दत्ता माने व सदा मलाबादे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने इचलकरंजी नगरपालिकेस काही सूचना केल्या होत्या. त्यापैकी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुढे शेती सिंचनासाठी द्यावे, तर काळा ओढा व चंदूर नाला येथेसुद्धा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करावेत. तसेच सीईटीपीतील पाणी शेती सिंचनासाठी द्यावे; अन्यथा प्रोसेसर्स कारखाने व सीईटीपी बंद ठेवावा, असे निर्देश दिले होते.
यापैकी सीईटीपीचे पाणी शेती सिंचनासाठी दिले आहे; पण इचलकरंजीत अर्धवट भुयारी गटार योजनेचे काम संथ गतीने सुरू असून, योजनेच्या पूर्ततेनंतर काळा ओढा व चंदूर नाला येथे सांडपाणी प्रकल्प उभा राहणार आहे.
तेरवाड बंधाऱ्यातून वाहतेय फेसाळलेले दुर्गंधीयुक्त पाणी
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात तीव्र संताप
कुरुंदवाड : पंचगंगा नदीला रसायनयुक्त काळेकुट्ट पाणी आले आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली असून, तेरवाड बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होताना फेसानेच पात्र भरून राहिले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, वारंवार आंदोलन करूनही तालुक्यातील नागरिकांची दूषित पाण्यापासून सुटका होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगा नदी दूषित पाण्याची समस्या शिरोळ तालुक्याला भेडसावत आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांना साथीच्या विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण विरोधी विविध संघटना आंदोलन करीत असले तरी याचा फारसा परिणाम प्रदूषण नियंत्रण मंडळावर झाल्याचे जाणवत नाही. अलीकडच्या काळात प्रदूषणाची तीव्रता जास्तच वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू बरगाले, महेश पाटील (टाकळी) आदींच्या, तर छत्रपती ताराराणी आघाडीचे प्रसाद धर्माधिकारी यांनी वारंवार आंदोलने केली आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत जिल्हाधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक होऊन नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा निर्णय झाला.
या निर्णयातून इचलकरंजीतील अनेक औद्योगिक कारखाने सील करून कारवाईचा फार्स केला, मात्र करखाने सुरू झाल्याने नदी प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’च राहिली.
नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने पाण्याचा रंग समजत नाही. केवळ दुर्गंधी येते. तेरवाड येथील बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होताना पाणी कसले आहे, हे कळते. पाणी काळेकुट्ट असून, रसायनयुक्त पाण्यामुळे नदीचे पात्र फेसाने भरले आहे. (वार्ताहर)
पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रशासन गंभीर
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : इचलकरंजी पालिकेच्या भेटीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला असून, यासाठी सहकार्य लागणाऱ्या सर्व घटकांना मी स्वत: फोन करून विनंती करणार आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या अन्य प्रश्नांबाबतही माहिती घेऊन त्यावर योग्य मार्ग काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिले.
इचलकरंजी नगरपालिकेस भेट देऊन नगरपालिकेच्या विविध अडचणींबाबत व प्रलंबित कामकाजाबाबतची माहिती सैनी यांनी घेतली. नगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी नगरपालिकेच्या मागण्यांचे निवेदन यावेळी सैनी यांना दिले. त्यावर बोलताना सैनी म्हणाले, इचलकरंजी नगरपालिका ही जिल्ह्यातील महत्त्वाची व अ वर्ग नगरपालिका आहे. येथील वसुलीही चांगली आहे. शहराचा मुख्य प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यासाठी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून शुद्ध पाणी नदीकाठच्या सर्वच गावांना मिळावे, यासाठी आपण प्रामुख्याने या प्रश्नाकडे लक्ष देत आहोत, असे स्पष्ट केले.
नगरपालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना नगरसेवक शशांक बावचकर यांनी, शहरातील गाळे लिलाव, एडीटीपी विभागाकडून प्रलंबित आहे. नगरपालिकेच्या मालकीचे सुमारे ७२० गाळे असून, सध्याच्या रेडीरेकनरप्रमाणे फेरलिलावास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. संजय केंगार यांनी, कचरा डंपिंग डेपोसाठी पर्यायी जागा द्यावी अथवा खण भरून देण्यास परवानगी द्यावी. तसेच शेतीकडे जाणारा रस्ता करण्यासाठीही कचऱ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यापैकी योग्य मार्ग द्यावा. उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी, नदीतील गाळ व वाळू उपसा करण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे नदीची खोली वाढून पाणी साठून राहण्यास मदत होईल. तसेच बाळासाहेब कलागते यांनी पूरग्रस्त परिसरातील समस्यांबाबत माहिती दिली.
पंचगंगा नदी प्रदूषित होण्यासाठी मुख्य कारणीभूत असणारे कोल्हापुरातून सोडले जाणारे मैलायुक्त सांडपाणी थांबवावे, यासह आयजीएम रुग्णालयातील मशिनरी दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेल्या मागणीस मंजुरी द्यावी व २०१५-१६ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन सैनी यांनी दिले. बैठकीस प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी सुनील पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, प्रकाश मोरबाळे, आदींसह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. (वार्ताहर)
शहरातील गुंठेवारी प्रकरणे
शहरहद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे तांत्रिक अडचणी निर्माण करून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, असा थेट आरोप प्रकाश मोरबाळे यांनी केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन आदेश देण्याचे आश्वासन दिले. मात्र, बैठक संपल्यानंतर लगेचच तहसीलदार शिंदे यांनी मोरबाळे यांना प्रकरणे निकालात काढण्याचे आश्वासन दिले.