Sudhir Mungantiwar: पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दिले होते. याबद्दलची घोषणा अर्थसंकल्पातून होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण, राज्य सरकारकडून कर्जमाफीचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी अर्थसंकल्पानंतर केली. आकडेवारीसहित मी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना हा मुद्दा मांडणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला.
"विधानसभेत हा मुद्दा आकडेवारीसहित मांडणार"
"आजही माझी मागणी आहे आणि मी अर्थसंकल्पावर बोलताना आकडेवारीसहित मी हा मुद्दा पुन्हा मांडणार आहे. कदाचित हा मुद्दा राहिला असेल, पण, हा मुद्दा राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या दृष्टीने उत्पन्न वाढवण्याच्या स्रोतांबद्दलही मी चर्चा करणार आहे. पण, शेतकऱ्यांना मात्र या दृष्टीने कर्जमुक्ती देण्याचा विचार सरकारने करावा, ही विनंती मी विधानसभेत निश्चित करणार आहे", अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.
अर्थसंकल्प अधिकाऱ्यांचा असू नये, मुनगंटीवारांचे सरकारला खडेबोल
"प्रश्न शिस्त लावणे किंवा लोकप्रिय घोषणांचा नाहीये. आपण जो राज्याच्या प्रगतीचा विभिन्न क्षेत्रामध्ये एक आराखडा तयार करतो. त्यानुरुप असलेल्या संसाधनांचा महत्तम उपयोग करणे म्हणजे अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प हा जनतेच्या प्रतिनिधींचा असावा. हा अधिकाऱ्यांचा असता कामा नये, याची काळजी घ्यावी लागते", अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या सरकारला खडेबोल सुनावले.
"आम्ही लोकांमध्ये जातो. लोकांच्या समस्या ऐकतो. ते प्रश्न अर्थसंकल्पातून कसे सोडवायचे? ते सोडवताना त्या दृष्टीने आपण विविध तरतुदी कशा करायच्या, याचा विचार अर्थसंकल्पात करतो", अशी मत मुनगंटीवार यांनी यावेळी मांडले.