गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:21 IST2025-11-05T09:20:09+5:302025-11-05T09:21:59+5:30
नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा पुस्तकाचे प्रकाशन

गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेनेत उठाव करून आम्ही गुवाहाटीला पोहोचलो. तिथून परत आलो. यातील वरची कथा सगळ्यांना माहीत आहे. पुस्तक लिहायचे तर खरी कथा मलाच माहीत आहे. त्यासाठी माझ्याशी बोलावे लागेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा विभागमंत्री उदय सामंत, अभिनेत्री निवेदिता सराफ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत. काही लोकांची आपल्यावर वाईट नजर आहे. बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन मे पडेगा फिर से पाला, लेकिन महायुती के गले मे ही पडेगी विजय की माला, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
समाजात अन्याय दिसला की तिथे धावून जाणे, दुर्बलांना आधार देत विकासाचा मार्ग दाखवणे या तत्त्वाचे गोऱ्हे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी लिहिलेले ‘दाही दिशा’ हे पुस्तक त्यांच्या संघर्षाचा, विचारांचा नकाशा आहे. त्यांचा संघर्ष, संवेदनशीलता व समाजसेवेच्या प्रवासाचा हा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. हा केवळ राजकीय नाही तर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. हे केवळ साहित्यिक काम नसून महिलांच्या, वंचितांच्या व शोषितांच्या आवाजाला दिशा देणारे कार्य असल्याचे ते म्हणाले.
आरक्षण मिळाले; पण संरक्षण नाही - नीलम गोऱ्हे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच; पण लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. राजकारणात महिलांना स्थान मिळाले असले तरी त्यांच्या सुरक्षिततेचे व सक्षमीकरणाचे काम अजून बाकी आहे. आरक्षण मिळाले; पण संरक्षण नाही. त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे. १९९५ ते २००५ या कालखंडातील महिला चळवळीतील संघर्ष, धोरणे, अनुभव पुस्तकात मांडले आहेत, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.