"रस्ता बनवून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येताे", मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:24 IST2025-06-12T09:23:52+5:302025-06-12T09:24:06+5:30
Devendra Fadnavis: माओवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिदुर्गम गावात ६ जून रोजी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. येथे भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री.

"रस्ता बनवून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येताे", मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
गडचिरोली - माओवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिदुर्गम गावात ६ जून रोजी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. येथे भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री. यावेळी मुख्यमंत्रिपदाचा अभिनिवेश न बाळगता व सुरक्षेचे सर्व निकष बाजूला ठेवून ते आदिवासींमध्ये मिसळले. जमिनीवर बसून स्थानिकांशी संवाद साधला. यातून त्यांच्या साधेपणाचे, संवेदनशीलतेचे दर्शन घडले. ‘काळजी करू नका, रस्ता करून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येतो, असा शब्दही त्यांनी दिला.
बॅरिकेड्स हटवून मिसळले लोकांमध्ये
जनजागरण मेळावा आटोपल्यानंतर सुरक्षेची पर्वा न करता मंचावरून उतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट स्थानिकांच्या दिशेने निघाले. कार्यक्रमस्थळी बॅरिकेड्समुळे त्यांना लोकांमध्ये जाता येईना.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत पोलिसांनी बॅरिकेड्स हटविले. मुख्यमंत्री थेट लोकांमध्ये जाऊन बसले. तुमच्यासोबत बसलो नाही तर प्रश्न कसे कळतील, असे बोलत त्यांनी संवादाला सुरूवात केली.
रोज सायकलने शाळेत जायचं
आदिवासी विद्यार्थिनींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. एका विद्यार्थिनीला कितवीत शिकते, असे विचारले. तिने आठवीत, असे उत्तर दिले. शाळेत कशी जाते, असे विचारले तेव्हा तिने पायीच जाते, असे सांगितले. त्यावर रोज शाळेत सायकलने जायचं, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिला सायकलही दिली.
अतिदुर्गम ठाण्यातून दौरा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवातच थेट छत्तीसगड सीमेवरील कवंडे या अतिदुर्गम पोलिस ठाण्याला भेट देऊन केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा हेलिकॉप्टरने होता.