एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी...
By Admin | Updated: November 28, 2014 01:06 IST2014-11-28T01:06:37+5:302014-11-28T01:06:37+5:30
संसाराच्या वेलीवर एक सुंदर फूल उमलले. सारी स्वप्ने मातेच्या डोळ्यात होतीच. तिच्या इवल्याशा पावलांत मातेचे जगच सामावले होते. पण नियतीने क्रूर डाव खेळला. जन्माला आल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच

एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी...
सहा दिवसांच्या चिमुकलीचे नेत्रदान : जग पाहण्याआधीच निरोप
नागपूर : संसाराच्या वेलीवर एक सुंदर फूल उमलले. सारी स्वप्ने मातेच्या डोळ्यात होतीच. तिच्या इवल्याशा पावलांत मातेचे जगच सामावले होते. पण नियतीने क्रूर डाव खेळला. जन्माला आल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच त्या चिमुकलीला या जगाचा निरोप घ्यावा लागला. तिच्या डोळ्यातल्या स्वप्नांना आकारच घेता आला नाही. आपल्या जन्मदात्या मातेला अन् पित्यालाही न पाहता ती वयाच्या अवघ्या सहाव्या दिवशीच निघून गेली. आता तिच्या आई-वडिलांचे डोळे डबडबले आहेत. त्यांचे हे पहिलेच अपत्य होते. आपल्या अपत्याचे कलेवर वाहून नेण्यासारखे मोठे दु:ख नाही...पण त्या चिमुकलीच्या वडिलांनी मात्र तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या सहा दिवसांच्या चिमुकलीचे डोळे दान करण्याचा हा जगातील कदाचित पहिलाच प्रसंग असावा. ती चिमुकली आता नाही, पण तिचे डोळे हे जग पाहणार आहेत. आपल्या माता-पित्याला पाहण्यासाठी तिचे डोळेही आतूर असावेत. तिचे डोळे कुणाच्या तरी शरीरातून हे जग पाहतील. ‘एकाच या जन्मी जणू...फिरूनी नवे जन्मेन मी’ हीच भावना त्या चिमुकलीचीही असावी.
सारेच सुरळीत होते. स्वाभाविकपणे विवाहानंतर घरात एका नवीन पाहुण्याची चाहूल लागली आणि सारे घरच आनंदाने सैरभैर झाले. दीपक सुरेश नरांजे आणि दीक्षापाली यांना तर मायबाप होण्याचा आनंद आयुष्य व्यापणाराच होता. मातेचे डोहाळे, गंमत, मजा आणि बाळाच्या जन्माची प्रतीक्षा. हळूहळू दिवस जवळ आले आणि नव्या जीवाच्या स्वागतासाठी सारेच उत्सुक झाले. दीक्षापाली यांना ५ नोव्हेंबर रोजी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. माता आणि बाळाची तपासणीही करण्यात आली. सर्व स्थिती योग्य होत्या आणि बाळही निरोगी होते. १९ नोव्हेंबरला डॉक्टरांनी सीझर करावे लागेल, अशी सूचना दिली. पण २० तारखेला काही कारणाने सीझर करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. २१ तारखेला सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. पण जन्म झाल्यावर बाळ रडलेच नाही.
बाळ रडले नाही म्हणून त्वरित बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. एकीकडे बाळंतपणाच्या कळा सोसल्याने मातेची शक्ती क्षीण झाली होती. ती जवळपास चार दिवस बेशुद्धावस्थेतच होती. बाळ अतिदक्षता विभागात आणि माता बेशुद्धावस्थेत. मातेचे दूध पिण्याचीही बाळाची शक्ती नव्हती.