मुंबई -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना PMLA कायद्यातील चुकीच्या वापराबाबत मी सतर्क केले होते. पी.चिंदबरम यांनी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव आणला होता. या कायद्याचा चुकीचा वापर होऊ शकतो असं मी सांगितले होते. हा प्रस्ताव घातक असल्याचं मी सक्त विरोध केला होता अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितली. संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.
शरद पवार यावेळी म्हणाले की, ईडी ही जी यंत्रणा आहे, ती कशी वागते? याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवतंय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी मी होतो. चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरम यांनी कायद्यामध्ये कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे? यासंबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर आणला. तो वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितलं की, हे जे प्रस्ताव आहेत ते अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये असं त्यांनी म्हटलं.
तसेच आरोपींनी स्वतःहून मी गुन्हा केला नाही, हे सिद्ध करायचं. त्या संबंधाची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. त्याला मी सक्त विरोध केला की, हे करू नका. उद्या राज्य बदललं की, त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागतील. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला. विशेषतः विरोधकांवर अशा केसेस या अधिक केल्या जातील, ही शंका माझ्यासारख्याला होती असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी एनडीए आणि यूपीए दोन राजवटींचा उल्लेख केलेला आहे. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या? याची माहिती त्यांनी दिली. एनडीएच्या काळामध्ये १९ जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळामध्ये ०९ लोकांवर आरोप पत्र दिलं.अटक कोणालाही केली गेली नाही. पण एनडीएच्या काळामध्ये काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, डीएमके, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अन्ना द्रमूक, मनसे, टीआरएफ एवढ्या पक्षांच्या नेत्यांवर चौकशी करून केसेस करण्यात आल्या. याचा अर्थ देशातील सबंध विरोधक हेच उध्वस्त करायचं असा आरोपही शरद पवारांनी केला.