परिपूर्ण आयुष्य जगलो, निरपेक्ष जगलो, जगाने उचलून धरले- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:06 IST2025-04-06T13:06:09+5:302025-04-06T13:06:39+5:30

प्रख्यात समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुलाखत घेतली.

I lived a perfect life lived an absolute life the world embraced me says Prakash Amte | परिपूर्ण आयुष्य जगलो, निरपेक्ष जगलो, जगाने उचलून धरले- प्रकाश आमटे

परिपूर्ण आयुष्य जगलो, निरपेक्ष जगलो, जगाने उचलून धरले- प्रकाश आमटे

जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीमागे आहे याचा अनुभव येईल, हे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. तुम्ही तुमचे काम सुरू करा, लोक आपोआप तुमच्या मागे येत जातात, असेही ते म्हणायचे. आम्ही त्यांनी दिलेल्या याच आदर्शावर वाटचाल केली. भामरागडसारख्या आदिवासीबहुल भागात काम करत राहिलो. आदिवासींकडून अनेक गोष्टी शिकलो, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.

आदिवासी संस्कृतीत आभार हा शब्दच नाही, हे सांगताना डॉ. आमटे यांनी सुरुवातीच्या काळात आलेला अनुभव सांगितला. एके दिवशी चार ते पाच आदिवासी एका आजारी असलेल्या आदिवासीला खाटेवर घेऊन त्यांच्याकडे आले. ती व्यक्ती गंभीर आजारी होती. बरी होईल की नाही याची शाश्वतीही नव्हती. बरोबर आलेले लोक त्या व्यक्तीला खाटेसह तिथेच सोडून निघून गेले. डॉ. आमटेंनी केलेल्या उपचारानंतर सात-आठ दिवसांनी ती व्यक्ती ठणठणीत बरी झाली. त्यानंतर ती व्यक्ती ज्या खाटेवरून आली होती, तीच खाट खांद्यावर उचलून घरी गेली. पण त्यावेळी त्या व्यक्तीने आमटेंचे आभारही मानले नाहीत. "आपण आपले काम करत राहावे, कुणाकडून अपेक्षा करू नये, हे आदिवासी संस्कृतीतून शिकलो", असे आमटे म्हणाले.

उक्ती आणि कृती यात विसंगती नसावी
आमटे म्हणाले, उक्ती आणि कृती यात विसंगती नसावी. बाबा तसेच वागायचे. आम्हीही त्यांचे अनुकरण केले. त्यामुळेच आमच्या मुलांनाही आमच्या वागण्या-बोलण्यात कुठे विसंगती आढळली नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावरही झाला. मोठा मुलगा आणि सून वैद्यकीय सेवा निष्ठेने सांभाळतात, तर छोटा मुलगा आणि सून शाळांची जबाबदारीने योग्यरीतीने सांभाळतात.

'नवी पिढी नव्या वाटा' कशासाठी?
आनंदवनात आमची तिसरी पिढी काम करत आहे. आम्ही आमच्या परीने काम करत राहिलो. आमच्या पुढच्या पिढीने ते कार्य पुढे नेले. आम्ही केलेल्या कामापेक्षा ते काम अधिक वेगळे आहे. त्याची माहिती लोकांना व्हावी, यासाठी 'नवी पिढी नव्या वाटा' हे पुस्तक लिहिले. आम्ही सगळ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहिलो, दूर राहिलो, साधेपणा जपला.

Web Title: I lived a perfect life lived an absolute life the world embraced me says Prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.