Eknath Shinde Uddhav Thackeray : "मराठी माणूस, मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो तो सगळ्यांना माहिती आहे. 'वरुन किर्तन आणि आतून तमाशा' असा उबाठाचा प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी कोणाला छेडत नाही. पण मला कुणी छेडलं किंवा त्रास दिला तर मी कोणालाही सोडत नाही", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाला इशारा दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
"मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार. मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी 'म' म्हणजे महापालिकेचा, मलिद्याचा, मतलबाचा आणि मतांचा आहे. तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे. पण मी आरोपांना आरोपाने नाही, तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे," अशी खरमरीत टीका शिंदे यांनी केली.
"इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले; आज मात्र त्यांच्याच मागे रोज जावे लागत आहे. 'चल मेरे भाई, तेरे हाथ जोडतां हू' अशी त्यांची अवस्था झाली आहे. भरलेल्या ताटाचे विचारता पण निकालानंतर जनतेच्या मतांची माती कोणी केली ते सांगा. २०१९च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्रजींनी ५० फोन केले. ते का नाही उचलले ते सांगा. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सत्ता सोडून गेलो पण गद्दारी तुम्ही केली", अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
फडवणीसांमुळे शिवसेनेला मुंबईचे महापौरपद
"मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केलं गेलं. या घटनेला आमदार मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत. भाजपने महापौरपदाची तयार केली होती, मात्र तुम्ही देवेंद्रजींना विनंती केली की महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या. त्यांनी अर्ध्या तासात विचार करुन पत्रकार परिषद घेत महापौरपद शिवसेनेला देऊन टाकले. पण २०१९ मध्ये तुम्ही दगा, धोका आणि विश्वासघात करुन त्याची परतफेड केलीत," अशी टीकाही शिंदे यांनी केली.