काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पूर्णपणे पराभव झाला होता. आपली विमानं पाडली गेली. भारताचे हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते. त्यावरून चव्हाण यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानामुळे उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यात काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. घटनेने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी लष्कराने आणि भारत सरकारने केलेले दावे खोडून काढणारं विधान केलं होतं. "ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आम्ही हरलो. लोक मान्य करा किंवा न करा, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते, तर पाकिस्तानने ते पाडले असते अशी दाट शक्यता होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते’’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.
याबरोबरच भारताच्या सैन्यदलात कपात करण्याची आवश्यकता असल्याचं विधानही चव्हाण यांनी केलं होतं. ‘’आता तुमच्याकडे कितीही पायदळ असले तरी काही फरक पडत नाही, कारण कोणीही तुम्हाला अशा प्रकारचे युद्ध लढू देणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे गेले नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, लढाई केवळ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरती मर्यादित होती आणि भविष्यातील युद्धेही त्याच प्रकारे सुरू राहतील. अशा परिस्थितीत, १२ लाख सैनिकांची सेना राखण्याची काय गरज आहे? त्यांचा वापर दुसऱ्या कशासाठी तरी करणे चांगले होईल’’, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.
Web Summary : Ex-CM Prithviraj Chavan refuses to apologize for his controversial Operation Sindoor statement, claiming India suffered defeat. He stands by his remarks, asserting his right to question the event and military spending.
Web Summary : पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूर पर अपने विवादास्पद बयान के लिए माफी मांगने से इनकार करते हैं, दावा करते हैं कि भारत को हार का सामना करना पड़ा। वह अपनी बात पर कायम हैं, घटना और सैन्य खर्च पर सवाल उठाने के अपने अधिकार पर जोर देते हैं।