BJP Suresh Dhas: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परळीत आयोजित केल्या जाणाऱ्या इव्हेंट्सवर बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्याने भाजप आमदार सुरेश धस वादात सापडले होते. धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या हेतूने भाष्य केल्याचा आरोप करत प्राजक्ता माळी हिने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसंच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. प्राजक्ता माळीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विविध कलाकारांनीही दिला पाठिंबा दिला होता. विविध स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर आज अखेर सुरेश धस यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सुरेश धस म्हणाले की, "प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ काढण्यात आला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो," असं धस यांनी म्हटलं आहे. "माझ्याकडून काहीही चुकलेलं नाही. मात्र तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे," अशीही भूमिका सुरेश धस यांनी मांडली आहे.
दरम्यान, "मला याबाबत आमचे नेते चंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की, चूक असेल किंवा नसेल माफी मागून टाका. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की लगेच माफी मागून टाकतो," असं सुरेश धस म्हणाले.
प्राजक्ताच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली? "अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाऊंटवरून देण्यात आली होती.