चोरी करण्यासाठी आले, आय लव्ह यू लिहून गेले!
By Admin | Updated: August 18, 2016 17:32 IST2016-08-18T17:32:04+5:302016-08-18T17:32:04+5:30
चोरट्यांनी अमुक रुपयांचा ऐवज लंपास केला, तमुक रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला, अशा मथळ्याच्या बातम्या आपण नेहमीच वृत्तपत्रांमध्ये वाचतो.

चोरी करण्यासाठी आले, आय लव्ह यू लिहून गेले!
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १८ - चोरट्यांनी अमुक रुपयांचा ऐवज लंपास केला, तमुक रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला, अशा मथळ्याच्या बातम्या आपण नेहमीच वृत्तपत्रांमध्ये वाचतो; परंतु इथे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका घरात काहीच हाती न लागल्यामुळे घरमालकाची माफी मागत भींतीवर आय लव्ह यू असे लिहून ठेवल्याचा अजब प्रकार अकोल्यातील उच्चभ्रू समजल्या जाणा-या रामनगर भागात गुरुवारी उघडकीस आला.
रामनगर हा अकोला शहराच्या मध्यभागी वसलेला भाग. शहरातील श्रीमंत लोकांची वस्ती असलेल्या या भागात बुधवारी रात्री चोरट्यांनी काही घरांना लक्ष्य केले. यावेळी चोरट्यांनी डॉ. किशोर मालोकार यांच्या घरातून रोख रक्कम व दागीणे लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी रामनगरातीलच आणखी एका घराला लक्ष्य केले.
त्यांच्या घरात काहीच न सापडल्यामुळे हताश झालेल्या चोरट्यांनी एका खोलीतील भींतीवर लिपस्टिकने चुक झाली माफ करणे, सॉरी, आय लव्ह यू असे लिहून ठेवले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सिव्हील लाईन पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.