“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:47 IST2025-12-17T13:46:58+5:302025-12-17T13:47:46+5:30
Shiv Sena Shinde Group News: कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामे कुठेतरी झाली पाहिजे. यापुढे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन, असे या नेत्याने म्हटले आहे.

“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
Shiv Sena Shinde Group News: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. यातच ठाकरे गटाचा जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एका बड्या नेत्याने आपल्या भावना बोलून दाखवल्या.
अलीकडेच तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा रामराम केला. यानंतर नवी मुंबईतील ऐरोली विभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी आणि तेजश्री मढवी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मढवी यांच्यासह ठाकरे गटाच्या ऐरोली शहर संघटिका सोनाली मोरे, विभागप्रमुख सुरेश भास्कर, शाखाप्रमुख अमित जांभळे, माजी परिवहन समिती सदस्य राजेश घाडी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच बेलापूर विभागातील राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम मिथुन पाटील यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला.
मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही नाराजी नाही. बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात जो आदर होता, तो कायम राहील. वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामे कुठेतरी झाली पाहिजेत. मी माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यापुढे मी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन, असे मनोहर मढवी यांनी सांगितले.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका उर्मिला गोसावी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अरुण गीध, माजी नगरसेविका वंदना गीध, बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविका सोनी अहिरे आणि समाजसेवक कपिल गोड पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.