Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:08 IST2019-12-06T22:07:34+5:302019-12-06T22:08:02+5:30
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे.

Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणतात..
मुंबईः हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. पण पोलिसांच्या चकमकीवर काहींनी टीकासुद्धा केली आहे. आरोपींना न्यायालयाच्या माध्यमातूनच शिक्षा व्हायला हवी होती, अशी काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनी या एन्काऊंटर आपलं मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत पोलिसांच्या या कृतीचं स्वागत केलं आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असं म्हणत राज ठाकरेंनी हैदराबाद पोलिसांवर कौतुक केलं आहे.
या चकमकीवर ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या चकमकीचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी असदुद्दीन ओवैसींनी केली आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे. हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, हे एन्काऊंटर अयोग्य होतं,' असं स्पष्ट मत ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad#Encounter#JusticeForDisha
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
दरम्यान, हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.