पत्नी आवडत नाही म्हणून तिची हत्या करून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: July 31, 2016 19:23 IST2016-07-31T19:23:15+5:302016-07-31T19:23:15+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि पत्नी आवडत नाही म्हणून अश्विनी अर्जु्न मोरे (२६) या विवाहितेची शॉक देऊन व डोक्यात हातोड्याचे घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

The husband tried to commit suicide by killing her because she did not like the wife | पत्नी आवडत नाही म्हणून तिची हत्या करून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी आवडत नाही म्हणून तिची हत्या करून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३१ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि  पत्नी आवडत नाही म्हणून अश्विनी अर्जु्न मोरे (२६) या विवाहितेची शॉक देऊन व डोक्यात हातोड्याचे घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पतीने विषारी द्रव प्राशन करुन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री कारी (ता. धारुर) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार अश्विनीचा (वय २६) चा विवाह सहा वर्षांपूर्वी कारी येथील अर्जुन योगानंद मोरे याच्याशी झाला होता. तिचे माहेर आनंदगाव (ता. माजलगाव) हे आहे. लग्नानंतर अश्विनीला दोन मुले झाली. त्यापैकी  एक पाच तर दुसरा तीन वर्षांचा आहे. अर्जुन आई- वडिलांना एकुलता एक असून त्यास पाच एकर जमीन आहे. मात्र, त्यात भागत नसल्याने अर्जुन तेलगाव येथील ह्यमाजलगावह्ण सहकारी साखर कारखान्यात रोेजंदारी मजूर म्हणून काम करतो.

लग्नानंतर काही वर्षे सुखाचा संसार झाला. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी घर बांधण्यासठी विहीर- पाईपलाईनसाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असा लकडा लावून तिच्या चारित्र्यावरसंशय घेऊन तिला घराबाहेर हाकलून दिले. आम्हाला तू आवडत नाही, अशा शब्दांत तिला अपमानीत केले. त्यामुळे ती वर्षापूर्वी दतेन महिने माहेरी येऊन राहिली होती. नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर ती पुन्हा नांदावयास गेली; परंतु छळ काही थांबला नाही.   

 पत्नी अश्विनीसोबत अर्जुनचे नेहमी खटके उडत. शनिवारी रात्री त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. जेवण केल्यानंतर साडेदहा वाजता पुन्हा ठिणगी पडली. यावेळी पती व सासू, सासऱ्यांनी तिला विजेचा शॉक दिला. ती ओरडली. मुलेही रडत होती. त्यानंतर संतप्त अर्जुनने जवळच पडलेला हातोडा तिच्या डोक्यात मारला. ती कोसळल्यानंतर त्याने पुन्हा तिच्या कपाळावर डोक्यात हातोड्याने घाव घातले. रक्तस्त्राव होऊन ती जागीच मृत्युमुखी पडली. रक्ताच्या थारोळ्यात पत्नीला सोडून अर्जुन दुसऱ्या खोलीत गेला. त्याने कपाशी फवारण्यासाठी आणलेले विषारी द्रव प्राशन करुन तो घराबाहेर आला. तोपर्यंत आरडाओरड व मुलांच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी धावून आले. त्यानंतर अश्विनीचा खून झाल्याचे  निदर्शनास आले. 

अर्जुनने विषारी द्रव प्राशन केल्याचे लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी त्यास धारुर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. इकडे अश्विनीच्या खुनाची वार्ता मध्यरात्री संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर अख्खे गाव मोरे यांच्या घराजवळ गोळा झाले. माहेरीही ही दु:खाची बातमी कळविण्यात आली.  

घटनास्थळी उपअधीक्षक राजकुमार चाफेकर, दिंद्रूड ठाण्याचे सहायक निरीक्षक रवि सानप यांनी रविवारी सकाळी धाव घेतली. अश्विनीचा मृतदेह ताब्यात घेतला. धारुर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यावेळी सासरच्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी माहेरच्यांनी लावून धरली. त्यांच्या आक्रमक पावित्र्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत काढली. सासरकडील मंडळी मात्र रात्रीच पसार झाली.

रुग्णालयात व अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित नव्हते.
याप्रकरणी मयत अश्विनीचा भाऊ राजाभाऊ जिाजाभाऊ थावरे (रा. आनंदगाव) यांच्या फिर्यादीवरुन पती अर्जुन योगानंद मोरे, सासू संजिवनी योगानंद मोरे, सासरा योगानंद शेषेराव मोरे, चुलत सासरा प्रकाश शेषेराव मोरे (सर्व रा. कारी) व मावस सासरा दिनकर श्रीकिसन शेंडगे (रा. मोरवड ता. वडवणी) या पाच जणांवर दिंद्रूड ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप एकालाही  अटक  नाही.

पोलीस दहा तास उशिरा!
कारी येथे खुनासारखी गंभीर घटना घडल्यानंतर दिंदू्रड पोलिसांनी तत्परता दाखवली नाही. रात्री गावातील लोकांनी ठाण्यात फोनवरुन कळविल्यानंतरही पोलीस पोहोचले नाहीत. रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर पोलीस गावात गेले. त्यानंतर पंचनामा व इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या. याचा फायदा घेऊन आरोपी रातोरात निसटले. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. 

आई, जागी हो ना!
कारी येथे अश्विनीवर शोकाकूल वातावरणात दुपारी अंत्यस्कार झाले. यावेळी अश्विनीच्या दोन्ही मुलांनी एकच टाहो फोडला. तीन वर्षांच्या धाकट्या मुलाने ह्यआई, तू जागी हो ना...ह्ण म्हणत तिच्या अंगावर पडून तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण वातावरण  सून्न झाले होते. 

गावात चूल पेटली नाही
खुनाच्या घटनेने कारी हे गाव हादरुन गेले. गावकरी रात्रभर मोरे यांच्या घराजवळ होते. सकाळपासून गावात चूल पेटली नाही. अश्विनीच्या हत्येमुळे अख्खे गाव हळहळ व्यक्त करत होते. 

Web Title: The husband tried to commit suicide by killing her because she did not like the wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.