हजारो विद्यार्थ्यांनी दिला वंदेमातरम्चा हुंकार
By Admin | Updated: August 15, 2014 00:44 IST2014-08-15T00:44:54+5:302014-08-15T00:44:54+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सक्करदरा चौकात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदेमातरम्चा गजर करून अखंड भारत निर्मितीचा संकल्प केला. देशभक्तीच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.

हजारो विद्यार्थ्यांनी दिला वंदेमातरम्चा हुंकार
सक्करदरा चौकात देशभक्तीचा पूर : छोटू भोयर यांचे आयोजन
नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सक्करदरा चौकात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदेमातरम्चा गजर करून अखंड भारत निर्मितीचा संकल्प केला. देशभक्तीच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.
अखंड भारत संकल्प दिनानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांच्यातर्फे दक्षिण नागपुरात हे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ)चे भारताचे प्रतिनिधी डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे प्रमुख वक्ते होते. डॉ. मिश्रा म्हणाले, राष्ट्राप्रति समर्पणाच्या भावामुळेच क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. मात्र आपल्याला खंडित स्वातंत्र्य मिळाले आहे.
देशाचा इतिहास एक असला तरी त्याचा भूगोल मात्र खंडित आहे. खंडित भूगोल पुन्हा एक करण्यासाठी दृढ संकल्पाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी विषद केले. नासुप्रचे विश्वस्त आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी देशाचं प्रारूप, स्वरूप काय होते, याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना असायला हवी. १५ आॅगस्ट रोजी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले, ते खंडित होते, हा इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. भारत अखंड नसला तरी त्याचे स्वप्न मनात बाळगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धुरडे, रिता मुळे, स्वाती आखतकर, नगरसेवक किशोर कुमेरिया, कैलाश चुटे, प्रशांत कामडे, दीपक धुरडे, विजय आसोले, अनिल लंबाडे, प्रशांत तुंगार, कल्पना पांडे, प्रमोद पेंडके, मंगला मस्के, ईश्वर धिरडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मासूरकर, प्रकाश देऊस्कर, डॉ. राजेश गादेवार, अजय बुग्गेवार, मुख्याध्यापिका शाहू यांच्यासह अंकुश पाटील, मनीष मेश्राम, प्रदीप कदम, अतुल पांडे, राकेश नरुले, आकाश घाटे, राहुल तांबे, मनोज शाहू, जगन वैद्य, अभिजित मुळे, बल्लू बाबरे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गजर राष्ट्रभक्तीचा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १७ शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी सक्करदरा चौकात एकत्रित होऊन सामूहिक वंदेमातरम् सादर केले. अखंड भारत संकल्प सेवा समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदेमातरम् सादर केल्याने वातावरण देशभक्तीच्या जाज्वल्य अभिमानात न्हाऊन निघाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतमाता आणि विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.