शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर
By Admin | Updated: August 6, 2016 00:28 IST2016-08-06T00:28:53+5:302016-08-06T00:28:53+5:30
खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार.

शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर
पुणे : खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. पुन्हा सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शेकडो कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे. नदीकाठच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाची गाडी रात्रभर गस्त घालत होती.
दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसह नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबे शाळा, मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरल्यावर पुन्हा ही कुटुंबे घरी परतली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
पानशेत धरणातून खडकवासाला धरणाच पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशामक दल, पोलीस व महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी नदीकाठच्या परिसरात तैनात करण्यात आले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित केले. त्यांची तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रजपूत झोपडपट्टीच्या राजीव गांधी वसाहतीमधील ६ कुटुंबांना व पुलाची वाडी येथील १६ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.
(प्रतिनिधी)
>स्थलांतरांचा प्रश्न लालफितीत...
मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या मागील झोपडपट्टीमधील नदीकाठच्या ४०० कुटुंबांना सातत्याने बाधित व्हावे लागत असल्याने त्यांना हडपसर येथील महापालिकेच्या घरांमध्ये बीएसयूपीअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नागरिकांनीही तिथे जाण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र महापालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे त्या नागरिकांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. ऐन पावसाळ्यात नदीचे पाणी शिरून कुटुंबांना विस्थापित व्हावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या कुटुंबांचे तातडीने बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रशासनाकडून स्थलांतर केले जावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अजय तायडे यांनी केली.