नागपूर : अॅफकॉन्स व तिच्या उपकंत्राटदारांनी मुरूम/दगड यासाठी केवळ खासगी जमीनच नव्हे, तर चक्क शेकडो एकर सरकारी जमीन व झुडपी जंगलही खोदून काढले आहे.
इटाळा गावात अॅफकॉन्सचे उपकंत्राटदार नागपूरच्या श्री साई श्रीनिवास कन्स्ट्रक्शन या कंपनीने सर्व्हे नं. ८, ११, १२, ९/१ ते ९/६ या खासगी जमिनीत मुरूम/दगडाचे उत्खनन केले आहे. ही जमीन गोविंद विठोबा गोमासे, वडगू कानबा सेंदरे, विनोद रामभाऊ ढुमणे व चोपकर कुटुंबीयांची आहे. याशिवाय सर्व्हे नं. ७ मधील झुडपी जंगल असलेल्या ३८.३९ हेक्टर सरकारी जमिनीतील दगड/मुरूमही उत्खनन करून काढले आहे. कोटंबा गावातील उत्खनन झालेले क्षेत्र १५०० फूट लांब २२५ फूट रुंद व ३० फूट खोल आहे. या जमिनीतून श्री साई श्रीनिवास कन्स्ट्रक्शनने एक कोटी एक लाख घनफूट दगड/मुरूम काढला आहे असे सोनोने यांच्या अहवालात नमूद केले आहे.या सर्व खासगी व सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे या सर्व सर्व्हे नंबरमधील जमिनीच्या सीमा/धुरे स्पष्ट दिसत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून या जमिनीचे सीमांकन करावे लागेल. त्यानंतरच नेमका किती ब्रास मुरुम चोरीला गेला ते कळेल असेही अहवालात म्हटले आहे.
असाच अहवाल सोनेने यांनी कोटंबा गावातील सर्व्हे नं. २०७/२-ब, २०९ व २१० या तीन जमिनीचा दिला आहे. यापैकी सर्व्हे नं. २०७ ही जमीन निलोफर मकबूल अली सैयद यांची तर सर्व्हे नं. २०९ ही जमीन मकबूल अली अब्बास अली सैयद यांची खासगी जमीन आहे. तर संपूर्ण सर्व्हे नं. २१० मध्ये झुडुपी जंगल आहे.कोटंबा गावात अॅफकॉन्सचे उपकंत्राटदार असलेल्या झज्जर (हरियाणा) येथील एस आर अँड असोशिएटसने दगड/मुरुमाचे अवैध उत्खनन केले आहे. हे क्षेत्र १२०० फूट लांब, ९० फूट रुंद व ३० फूट खोल आहे. यातून ३२-४० लाख घनफूट मुरुम/दगड काढला आहे. मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने तिन्ही जमिनीचे सीमा/धुरे स्पष्ट दिसत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सीमांकन केल्यानंतर नेमका किती ब्रास मुरुम काढला ते कळेल, असे सोनेने यांनी अहवालात लिहिले आहे.