'एचएसआरपी'ची काळी बाजू समोर; हजारो लोकांचे उत्पन्न थांबणार, नंबर प्लेट दुकानदारांनी काय करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 08:40 IST2025-03-04T08:37:28+5:302025-03-04T08:40:40+5:30
HSRP Number Plates Side Effects: नंबर प्लेट बनविणारे, रेडिअम कोरणारे तसेच या व्यवसायाशी संबंधीत अनेक लोकांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागणार आहे.

'एचएसआरपी'ची काळी बाजू समोर; हजारो लोकांचे उत्पन्न थांबणार, नंबर प्लेट दुकानदारांनी काय करायचे?
राज्य सरकारने सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. यासाठी जादा दर आकारत असल्याचे आणि गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिल्याचे आरोप होत असताना या नंबर प्लेटची आणखी एक काळी बाजू समोर येत आहे. या एचएसआपरी नंबरप्लेटमुळे हजारो लोकांचा रोजगार बुडणार आहे.
नंबर प्लेट बनविणारे, रेडिअम कोरणारे तसेच या व्यवसायाशी संबंधीत अनेक लोकांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागणार आहे. प्रत्येक शहरात, तालुक्याच्या ठिकाणी असे अनेक नंबरप्लेट बनवून देणारे लोक काम करत होते. २०१९ पासूनच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावली जात होती. परंतू त्यापूर्वीच्या वाहनांना जुनीच रेडिअमवाली नंबरप्लेट होती. या वाहनांची संख्या जास्त असल्याने या लोकांना काम मिळत होते. ते आता बंद होणार आहे.
सरकारन काही कंपन्यांना कंत्राट दिले आहे. त्यांनी आपापले एजंट नेमले आहेत. त्यांच्याकडूनच रजिस्टर करून तुम्हाला एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्यायची आहे. इतरत्र कुठेही ही नंबर प्लेट बनवून मिळणार नाही. तसेच ही नंबरप्लेट त्याच एजंटकडून लावून मिळणार आहे. या नंबरप्लेटला स्क्रू नसल्याने ती कायमस्वरूपी न काढता येणाऱ्या स्क्रूला जोडली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गोष्टी करण्यात येत असल्या तरी हजारो लोकांच्या पोटावर पाय येणार आहे.
अनेक नंबर प्लेट बनवून देणाऱ्या दुकानदारांचे संसार उघड्यावर पड़णार आहेत.अनेकांनी कर्ज घेतलेली आहे, मुले शिक्षण घेत आहेत. अचानक आपला रोजगार जाणार असल्याने हे सर्व कसे भरायचे, घर कसे चालवायचे असा प्रश्न आता या नंबर प्लेट व्यावसायिकांसमोर उपस्थित होत आहे. गेली कित्येक वर्षे ते हाच व्यवसाय करत आहेत. त्यांनी जी यंत्रे घेतली आहेत ती बिनकामी ठरणार आहेत. सरकारने या एचएसआरपी नंबर प्लेट बनविण्याचे काम आम्हाला द्यावे अशी मागणी नंबर प्लेट व्यावसायिकांनी केली आहे.