मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बसला एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तयारी केली आहे. आत्तापर्यंत महामंडळाने १२ हजार ३४१ नंबरप्लेटची ऑर्डर दिली असून, त्यापैकी ११ हजार २६८ प्लेट मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे २ कोटी वाहनांवर एचएसआरपी म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये लाखो शासकीय वाहनांचादेखील समावेश आहे. एसटीच्या ताफ्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १४ हजारपेक्षा जास्त बस आहेत. एका एचएसआरपी प्लेटसाठी ८७९ रुपयांचा खर्च आहे. त्यानुसार महामंडळाला ताफ्यात असलेल्या जुन्या बससाठी अंदाजे १ कोटी ८ लाख ४७ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखेर एसटीलाही नियम लागूनव्याने दाखल झालेल्या अनेक बसलाच एचएसआरपी नसल्याचे ‘लोकमत’ने मार्च महिन्यात निदर्शनास आणले होते. त्यामुळे एकीकडे राज्यातील सामान्य वाहनधारकांना एचएसआरपीची सक्ती करताना सार्वजनिक वाहतूक उपक्रमातील एसटी महामंडळाला हा नियम लागू होत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान, त्यानंतर कंपनीला तत्काळ या नंबरप्लेटचा पुरवठा करण्यास सांगितल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एचएसआरपीशिवाय वाहन रस्त्यावर चालविणे नियमबाह्य असल्याने कंपनीने पुरवठा करताना चूक केल्याबद्दल त्यांना काही दंड केला की नाही, याबाबत मात्र माहिती दिलेली नाही.