‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:53 IST2025-05-06T05:53:26+5:302025-05-06T05:53:38+5:30
मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली झाल्या उत्तीर्ण I १,९२९ महाविद्यालयांचा निकाल लागला १०० टक्के I ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा I सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्क्यांसह यंदाही राज्यात अव्वल I कोकण विभागाचा पहिला नंबर तर लातूर विभाग तळाला

‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. त्यामुळे 'महाराष्ट्रातल्या लेकी हुश्शार...' यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पैकीच्या पैकी गुण मात्र कुणालाच मिळालेले नाहीत. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्यात आल्याचा दावा मंडळाने केला असताना मागीलवर्षीच्या तुलनेत निकाल सुमारे दीड टक्क्यांनी घटला आहे. राज्यातील १,९२९ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. १५,८२३ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पैकीच्या पैकी गुण नाहीच
पुणे : शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या १,९२९ असून, यंदाच्या निकालात शंभर टक्के गुण कोणत्याच विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाहीत.
कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली. निकाल कमी लागला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत फार तफावत नाही, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
३८ महाविद्यालयांना भाेपळा मिळाला आहे. गतवर्षी २१ महाविद्यालयांना भाेपळा मिळाला.
बारावीचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीत बदल हाेणार असून, २०२७-२८ मध्ये अंमलबजावणीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शंभर टक्के निकाल दिलेल्या शाळांची संख्या यंदा ३१७ ने घटली, भोपळाही फोडता न आलेल्या कॉलेजेसची संख्या १७ ने वाढली.
दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
यंदा ६,७०५ (९२.३८ टक्के)
गतवर्षी ६,५८१ (९४.२० टक्के)
परीक्षा केंद्रांची संख्या ३,३७३
यंत्रणा बदलण्यात आलेली केंद्रे ८१२
बारावीचा जिल्हानिहाय निकाल
सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्के निकालासह राज्यात पहिला ठरला आहे. कोकण बोर्ड निर्मितीनंतर २०१२ पासून सलग तेरा वर्षे या जिल्ह्याने यशाची परंपरा कायम राखली आहे.