गांजा किती? ९ एकरांमध्ये ९६,००० झाडे; मुंबई पथकाने धुळ्यात जाऊन लावली आग, मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:11 IST2025-04-03T05:11:11+5:302025-04-03T05:11:55+5:30
Dhule News: शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली.

गांजा किती? ९ एकरांमध्ये ९६,००० झाडे; मुंबई पथकाने धुळ्यात जाऊन लावली आग, मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई
शिरपूर (धुळे) - तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली. या कारवाईदरम्यान सांगवी पोलिस अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. नष्ट करण्यात आलेला गांजा कोेट्यवधी रुपयांचा होता.
पथकाने बुधवारी सकाळी गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली. सात ठिकाणी करण्यात येत असलेली शेती उद्ध्वस्त करण्यासाठी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप घेण्यात आले आणि भूअभिलेखांसह जिओ-टॅग केलेल्या छायाचित्रांची नोंद करण्यात आली. एनडीपीएस कायद्याच्या कलम ४८ अंतर्गत संपूर्ण गांजाची शेती जप्त करून नष्ट करण्यात आली. या कारवाईत एकूण ९६ हजार ४९ गांजाची बेकायदेशीर झाडे नष्ट करण्यात आली, तसेच ४२० किलो वाळवलेला गांजा, गोण्यांमध्ये भरलेला आढळला. तो जप्त करून नष्ट करण्यात आला.
स्थानिक पोलिस अनभिज्ञ
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बाहेरील पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.