कसा संपेल विळखा ?

By Admin | Updated: November 5, 2014 00:53 IST2014-11-05T00:53:42+5:302014-11-05T00:53:42+5:30

शहरात डेंग्यूची संख्या २५८ वर गेली आहे. महानगरपालिकेला आतापर्यंत ११,४८५ घरात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.

How to escape? | कसा संपेल विळखा ?

कसा संपेल विळखा ?

२५८ जणांना डेंग्यूचा डंख : ११,४८५ घरात आढळल्या डेंग्यू डासांच्या अळ्या
नागपूर : शहरात डेंग्यूची संख्या २५८ वर गेली आहे. महानगरपालिकेला आतापर्यंत ११,४८५ घरात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. याचे खापर महानगरपालिका, आरोग्यविभाग प्रशासनावर फोडले जात आहे. मात्र, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शहरासाठी गावासाठी आपलीही काही जबाबदारी आहे. वेळीच उपाययोजना केल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी डेंग्यू म्हणजे काय, हे जाणून घेण्याचे आवाहन मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केले आहे.
डेंग्यूचा डास कसा ओळखाल ?
हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे पाच सेंटीमीटर असतो, या डांसाची मादी डेंग्यू रु ग्णाला चावल्यानंतर ती पुन्हा निरोगी व्यक्तीला चावते व निरोगी व्यक्तीला डेंग्यू होतो याप्रकारे या रोगाचा प्रसार होतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. जास्त दिवस पाणी साठलेले असल्यास त्यात हे डास (स्वच्छ पाण्यात)अंडी घालतात. एक डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालतो त्यातून ‘एडीस एजिप्टाय’चा फैलाव होतो.
ही आहेत लक्षणे
‘एडीस एजिप्टाय’ संक्र मणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्यूची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेच्या तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या आदी लक्षणेही जाणवतात.
ही आहेत कारणे
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार ‘एडीस एजिप्टाय’ नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरु पयोगी टायर्स, कूलर आदींमध्ये साठलेल्या पाण्यावर या डासांची उत्पत्ती होते.

Web Title: How to escape?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.