देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:45 IST2025-01-29T14:44:45+5:302025-01-29T14:45:43+5:30
१ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे याची माहिती घेतात असं बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं
मुंबई - मुख्यमंत्र्यांनी सरकार वाऱ्यावर सोडलं आहे. त्यांचे दौरेच सुरू असतात असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस ई ऑफिसमधून उत्तम प्रकारे प्रशासन चालवतात. महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास विरोधकांनी बघितला पाहिजे. राज्याने कोणकोणत्या यशस्वी योजना दिल्यात हे पाहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकार देशात सर्वोकृष्ट कामकाज करतंय असं त्यांनी म्हटलं.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासातलं १४-१९ या काळापेक्षा अधिक उत्तम आणि १०० पट जास्त काम करणारं सरकार देवेंद्र फडणवीस करतायेत. ते या राज्याला मोदींच्या संकल्पनेला शोभणारं काम करतायेत. देवेंद्र फडणवीस २४ तास ३६५ दिवस शासनाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांचा पूर्ण वेळ, एक एक मिनिटे आदेश पारित करण्यासाठी राहतो. त्यांचा मोबाईल जनतेसाठी आणि शासनासाठी उपलब्ध आहे. आजही ३-४ निर्णय त्यांनी तात्काळ मोबाईलवरून आणि त्यांच्या ई ऑफिसमधून घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस ई ऑफिस चालवतायेत. त्यातूनही राज्य चालवता येते असं बावनकुळेंनी सांगितले.
तसेच दावोस दौऱ्यावर असतानाही फडणवीसांनी ई ऑफिसमधून काम केले. आता दिल्लीतून ते काम करतायेत. कुठलाही शासन निर्णय अडत नाही. शासनाचे काम थांबत नाही. १ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे. कोणत्या शासन आदेशाची गरज आहे ते ई ऑफिसमधून पाहतात असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
सुप्रियाताईंनी राज्याची बदनामी करू नये
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी अभ्यास केला पाहिजे. इतर राज्याची तुलना महाराष्ट्राशी करू नये. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करू नये. महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास त्यांनी पाहिला पाहिजे. महाराष्ट्राने काय काय योजना दिल्यात, यशस्वीरित्या पोहचवल्यात ते पाहिले पाहिजे. नीती आयोगाचा कुठल्या वर्षाचा आकडा आहे माहिती नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार देशात सर्वोकृष्ट कामगिरी करतंय. सुप्रिया सुळेंनी राज्याची बदनामी करू नये असा टोला बावनकुळेंनी लगावला.