आरोपींची घरे जाळली

By Admin | Updated: July 31, 2016 03:17 IST2016-07-31T03:17:29+5:302016-07-31T03:17:29+5:30

कोपर्डी घटनेच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न झाल्याने भांबोरा गावात शनिवारी संतप्त पडसाद उमटले.

The houses of the accused were burnt | आरोपींची घरे जाळली

आरोपींची घरे जाळली


कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी घटनेच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न झाल्याने भांबोरा गावात शनिवारी संतप्त पडसाद उमटले. आरोपींची घरे पाडून ती पेटवूनही देण्यात आली. मात्र, ही घरे ग्रामस्थांनी पाडली नसून ती आरोपींच्या नातेवाइकांनीच जाणीवपूर्वक पाडली व पेटवल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
एका शालेय विद्यार्थिनीस शुक्रवारी दुपारी रस्त्यात अडवून पाच तरुणांनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या मुलगी सुखरूप बचावली.
यातील तीन आरोपींना ग्रामस्थांनी पकडले आहे. आरोपींना घेण्यासाठी आलेले पोलीस दारुच्या नशेत तर्र असल्याने ग्रामस्थांनी आरोपींसह पोलिसांना सहा तास डांबून
ठेवले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार एम.वाय. सय्यद, के.एच. निमसे, पोलीस शिपाई
के.एफ. कोळेकर यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले आहे.
मुलीची छेडछाड, विनयभंग व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे, तर देवगुन्या सदाशिव काळे (२०) याला तीन आॅगस्टपर्यंत
पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
ग्रामस्थांनी शनिवारी दिवसभर बंद पाळून घटनेचा निषेध केला. ग्रामसभेत मुलींना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. सकाळी आरोपींच्या घरांची तोडफोड करून ती जाळण्यात आली. हे कृत्य आरोपींच्या नातेवाइकांनीच केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तणावामुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी तातडीने गावास भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे. माजी मंत्री सुरेश धस हेही गावात गेले होेते. (तालुका प्रतिनिधी)
।प्रशासन जबाबदार
अन्य मुलीमार्फत आरोपींपैकी एकाने गुरुवारी संबंधित मुलीला चिठ्ठी पाठवून धमकी दिली होती. ही चिठ्ठी मुलीने शिक्षकांना दाखवली होती. मात्र त्यावर शिक्षकांनी कार्यवाही न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप माजी मंत्री सुरेश
धस यांनी केला आहे.
ग्रामस्थांनी शांतता राखावी
दोषी पोलिसांना निलंबित केले आहे. ग्रामस्थांनी शांतता राखावी. मुलींसाठी बसची सुविधा केली जाईल.- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री

Web Title: The houses of the accused were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.