उपचारासाठी रुग्णालये सज्ज
By Admin | Updated: August 18, 2014 04:03 IST2014-08-18T04:03:20+5:302014-08-18T04:03:20+5:30
दहीकाला उत्सवासाठी गोविंदा पथकांची जोमाने तयारी सुरू आहे. त्याचबरोबरीने दुर्घटनांसाठी शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयेही सज्ज झाली आहेत.

उपचारासाठी रुग्णालये सज्ज
मुंबई : दहीकाला उत्सवासाठी गोविंदा पथकांची जोमाने तयारी सुरू आहे. त्याचबरोबरीने दुर्घटनांसाठी शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयेही सज्ज झाली आहेत. मुंबईतील पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये आणि जेजेमध्ये मिळून ७० खाटा गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दहीहंडीचा सराव करताना यंदा जखमी झालेल्या गोविंदांची संख्या ७ वर गेली आहे. या सातही गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वेळी एक थर कमी लावा, पण अपघात टाळा, असे दहीहंडी समन्वय समितीने सांगितले आहे. तरीही इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे रुग्णालयांनी पूर्ण तयारी ठेवली आहे. केईएम रुग्णालयामध्ये १५ ते २० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, एक २५ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. आॅर्थोपेडिक्स, सर्जरी विभागातील ८ डॉक्टर आणि इतर डॉक्टरांचा या टीममध्ये समावेश असेल. याच बरोबरीने सुरक्षेच्या दृष्टीनेही आपत्कालीन विभागामध्ये सुरक्षारक्षक तैनात केले आहेत, अशी माहिती केईएमच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. नायर रुग्णालयामध्ये १५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सायन रुग्णालयामध्ये एक वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यामध्ये २० खाटा राखीव ठेवल्या आहेत, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. जेजे रुग्णालयामध्ये २० खाटा गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. पालिका रुग्णालयांमध्ये गोविंदांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)