निघोजमध्ये मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार
By Admin | Updated: July 27, 2016 01:35 IST2016-07-27T01:35:31+5:302016-07-27T01:35:31+5:30
निघोज येथे ३१ जुलैला दारूबंदीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

निघोजमध्ये मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार
पारनेर (अहमदनगर) : निघोज येथे ३१ जुलैला दारूबंदीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली असून, मतपत्रिकेत तत्काळ बदल न केल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
निघोजकरांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदी कार्यकर्त्यांनी आडव्या बाटलीवर शिक्का मारण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दारू विक्रेत्यांनीच निवडणुकीमध्ये उभी बाटली-आडवी बाटली अशी चिन्हेच नसल्याचे सांगत आडव्या बाटलीवर आक्षेप घेतला. शासनाच्या २००८च्या अध्यादेशात दारूबंदी निवडणुकीतील मतपत्रिकेत कोणतेच चिन्ह नसल्याचे दिसून येत असून, फक्त मतदानाची तारीख, वेळ व ठिकाण यांच्यासह मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी, असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत. मतपत्रिकेवर उभी-आडवी बाटलीचे चिन्ह नसल्याने अनेक महिलांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)