"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 19:44 IST2025-04-27T19:44:10+5:302025-04-27T19:44:10+5:30

पहलगाममध्ये मृत्यूमूखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Honor the victims of the Pahalgam attack with the Civil Bravery award Supriya Sule demands from the Chief Minister | "पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

Pahalgam Terror Attack:  जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १५ राज्यातील पर्यटक मृत्यूमूखी पडले होते. या हल्ल्यात महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतावाद्यांनी महाराष्ट्रातील सहा पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश होता. यात डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. पनवेलमधील दिपील भोसले (६०) यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी या मृतांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावी असं म्हटलं आहे. तसेच पिडितांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी सुळेंनी केली आहे.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय?

"जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरीकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने (सर्व राहणार डोंबिवली), दिलिप डिसले (पनवेल), कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे पुण्याचे रहिवाशी मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे. ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून या दहशवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरीक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचा वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उड़ती मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरीकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवली जात नाही. आपल्या घरातील कर्ते पुरुष अतिरेकी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखविणे सोपे नाही," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"म्हणूनच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. स्व संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. याच धर्तीवर इतर पिडीतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येईल. पा कृतीद्वारे या शूर कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्यासोबत उभी आहे असा विश्वास शासनाने द्यावा, ही नम्र विनंती. मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन या विनंतीचा नक्कीच विचार करुन त्यावर सकारात्मक निर्णय जाहीर करेल," असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
 

Web Title: Honor the victims of the Pahalgam attack with the Civil Bravery award Supriya Sule demands from the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.