पित्याला मारहाण करून केले बेघर
By Admin | Updated: August 15, 2016 03:45 IST2016-08-15T03:45:39+5:302016-08-15T03:45:39+5:30
वृध्द पित्याला जबर मारहाण करून पोटच्या मुलानेच बेघर केल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे.

पित्याला मारहाण करून केले बेघर
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- वृध्द पित्याला जबर मारहाण करून पोटच्या मुलानेच बेघर केल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. अनेक दिवसांपासून ही वृध्द व्यक्ती नेरुळ परिसरात जखमी अवस्थेत निवाऱ्याच्या शोधात फिरत होती. अखेर एका दक्ष नागरिकाने त्यांची विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यामुळे त्यांना तातडीने उपचार मिळू शकले आहे.
रविदास सखाराम माखरे असे या पीडित वृध्दाचे नाव असून ते अंदाजे ८० वर्षांचे आहेत. मागील काही दिवसांपासून ते नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात जखमी अवस्थेत फिरत होते. उजवा हात खांद्यातून निखळल्यामुळे निकामी झालेला होता. निवाऱ्याच्या शोधात जागा मिळेल त्याठिकाणी बसणाऱ्या या वृध्दाकडे अद्यापपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते. अखेर नेरुळ परिसरातच राहणाऱ्या हरुण सय्यद यांची त्यांच्यावर नजर पडली असता, त्यांनी केलेल्या चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
रविदास माखरे असे त्यांचे नाव असून ते नेरुळ गावातील राममंदिरलगतचे राहणारे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोटच्या मुलानेच जबर मारहाण करुन काही दिवसांपूर्वी घराबाहेर काढल्याचेही त्यांनी सांगितले.
हरुण सय्यद यांनी रविदास यांची व्यथा ऐकताच त्यांना तत्काळ तेरणा रुग्णालयात दाखल केले. तसेच नेरुळ पोलिसांनाही सदर घटनेची माहिती दिली. परंतु वृध्दापकाळात त्यांना बेघर करणाऱ्या त्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलाने आपल्या आईला घरात ठेवले असले तरी तिने धुणीभांडी करुन जमवलेल्या पैशावरही मुलगा अधिकार गाजवत असल्याचे त्यांनी सांगितले.