नवीन वर्षात घर महागणार
By Admin | Updated: January 1, 2015 01:31 IST2015-01-01T01:31:11+5:302015-01-01T01:31:11+5:30
दरवर्षी प्रमाणे यंदाही जमिनीच्या सरकारी दरात वाढ झाल्याने नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. शहरात ही वाढ ७.७ टक्के तर ग्रामीण मध्ये १८.८९ टक्के आहे.

नवीन वर्षात घर महागणार
रेडिरेकनरचे नवे दर: शहर ७.७%, ग्रामीण १८.८९% वाढ
नागपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही जमिनीच्या सरकारी दरात वाढ झाल्याने नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. शहरात ही वाढ ७.७ टक्के तर ग्रामीण मध्ये १८.८९ टक्के आहे. ७० टक्के भाग या दरवाढीपासून बचावला आहे. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवीन दर लागू केले जातात व दरवर्षी त्यात वाढ होत असते.यंदाही चित्र तेच आहे. बँका गृहकर्ज देताना आणि खरेदी विक्रीचे व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटीसाठी जमिनीचे सरकारी दर हेच आधार मानतात. त्यामुळे रेडिरेकनरच्या दराचा थेट परिणाम बाजारभावावर होतो. राज्याचा नगर रचना विभाग ३१ डिसेंबरला रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर करतो. त्यानुसार यंदा शहरातील नवीन वस्त्यांमधील जमिनीच्या दरात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. भामटी व हिवरी या सारख्या भागात जमिनीच्या दरात वाढ झाली आहे.
नागपूर विभागात केवळ नागपूर हा असा जिल्हा आहे की जेथे अनेक वस्त्यांमधील जमिनीचे दर वाढले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के भागात मागील वर्षीचेच दर कायम ठेवण्यात आले आहे. ३० टक्के भागातील जमिनीच्या सरकारी दरात ७.७ टक्के ते १८.८९ टक्के वाढ झाली आहे. गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के , चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात ८ टक्के, गोंदिया जिल्ह्यात १० टक्के वाढ झाली आहे. विभागातील सरासरी वाढ ही १४ टक्के आहे.
संकेतस्थळ ठप्प ,सौदे टळले
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून रेडिरेकनरचे वाढीव दर लागू केले जातात. यामुळे स्टॅप ड्युटी अधिक द्यावी लागते. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी लोकं ३१ डिसेंबरच्या पहिले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करतात. यंदाही असेच चित्र होते. लोकं मोठ्या संख्येने खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी निबधंक कार्यालयात पोहोचले.पण आॅनलाईन पेमेंट स्वीकारणारे संकेतस्थळ (वेबसाईट) ठप्प झाली होती. कार्यालयीन कामकाज संपल्यावर ती सुरू झाली. आता वाढीव दराने खरेदी विक्रीचे व्यवहार करावे लागणार असल्याने सरासरी १५ ते २० टक्के रकमेचा फटका बसणार आहे.