दोन तास ओलीस ठेवून हिसकावली शस्त्रे
By Admin | Updated: December 22, 2014 00:42 IST2014-12-22T00:42:56+5:302014-12-22T00:42:56+5:30
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा वनपरिक्षेत्रातील कोंजेड भागात शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास ३० ते ४० च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना दोन तास

दोन तास ओलीस ठेवून हिसकावली शस्त्रे
वन कर्मचाऱ्यांना मारहाण : ६० काडतूसही पळविले, जंगलात न फिरण्याचा माओवाद्यांनी दिला दम
जिमलगट्टा (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा वनपरिक्षेत्रातील कोंजेड भागात शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास ३० ते ४० च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना दोन तास ओलीस ठेवून मारहाण केली व त्यानंतर शस्त्रे हिसकावून घेतली, अशी माहिती मिळाली आहे.
देचलीपेठा वनपरिक्षेत्रात नियत क्षेत्र कोंजेड येथील कक्ष क्रमांक ७२ मध्ये जंगलात देचलीपेठाचे वनपरिक्षेत्राधिकारी मराठे यांच्या आदेशानुसार देचली व जिमलगट्टा येथील वन कर्मचारी संयुक्तरित्या तस्करांना पकडण्यासाठी गस्तीवर असताना कोंजेड गावापासून चार ते पाच किमी अंतरावर जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी त्यांची गाठ पडली. नक्षलवाद्यांनी सर्व वन कर्मचाऱ्यांना घेराव घालून दीड ते दोन तास ओलीस ठेवले. यावेळी नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्याकडील तीन एसएलआर बंदूका व ६० जीवंत काडतूस हिसकावून घेतले. ‘जंगल हमारा है, हम ही जंगल का रक्षण करेंगे’ असे सांगून जंगलात यानंतर फिरायचे नाही, अशी धमकी नक्षलवाद्यांनी त्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांना नक्षलवाद्यांनी मारपीटही केली. ३० ते ४० च्या संख्येत सशस्त्र असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस ठाण्याला याची तक्रार द्या, अशी ताकीदही दिली, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांनी रविवारी जिमलगट्टा पोलीस ठाण्यात ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिमलगट्टा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी शस्त्र अधिनियम ३/२५ नुसार कलम ३९५ , ३९७, ३८३, १८६, ३२३, ३२२ (१२० ब) नुसार अज्ञात नक्षलवाद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास देचलीपेठा पोलीस करीत आहे. या घटनेनंतर कोंजेड भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलीस अभियान राबवित असल्याची माहिती जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी ‘लोकमत’ला दिली. (वार्ताहर)
२४ वन कर्मचारी होते गस्त’
देचली वनपरिक्षेत्रात कोंजेड येथे वनतस्कर सागवान वृक्षतोड करण्यासाठी बैलबंडीसह २० ते २५ जण लाकूड कापण्याच्या हत्यारासह आलेले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्राधिकारी आर. ए. मराठे यांना फोनद्वारे गुप्तपणे देण्यात आली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे २४ कर्मचाऱ्यांना जंगलात शस्त्र घेऊन जाण्याची सूचना केली. त्यानुसार देचली येथील जांभुळे, वनपाल राठोड, वनरक्षक अवतरे व १५ वनमजूर तर जिमलगट्टा येथील वनरक्षक आर. बी. निम्राड, पी. व्ही. दुधे, डी.सी. करेवार, सी. के. चौधरी व दोन वनमजूर असे २४ कर्मचारी गस्तीवर निघाले. कोंजेडपासून पाच किमी अंतरावर जंगल पहाडीवर नक्षलवाद्यांनी या कर्मचाऱ्यांनान गाठले व त्यांना ओलीस ठेवून मारहाण केली व शस्त्र हिसकावून घेतले.