इतिहासाचे राजवैभव भंगारात
By Admin | Updated: May 30, 2014 09:06 IST2014-05-30T01:14:22+5:302014-05-30T09:06:42+5:30
अनिल साठे , भिंगार माणूस इतिहासाचा विचार करतो, तेव्हा तो माणसाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

इतिहासाचे राजवैभव भंगारात
अनिल साठे , भिंगार माणूस इतिहासाचा विचार करतो, तेव्हा तो माणसाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. माणसाप्रमाणे एखाद्या हत्तीला, वृक्षाला,दगडालाही भूतकाळ असतोच. प्राणीशास्त्राच्या दृष्टिने इतिहास, वनस्पतीशास्त्रज्ञाच्या दृष्टिने वृक्षाचा भूतकाळ आणि भूवैज्ञानिकाच्या दृष्टिने दगडाचे जुने स्वरुप ह्याही गोष्टी अर्थपूर्ण आहेत. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणार्या वास्तुंचा अनमोल ठेवा, इतिहास प्रेमींसाठी संशोधनाकरीता महत्त्वाचा दुवा असतो. मात्र हा दुवाच भिंगारमध्ये भंगारात गेला आहे. जुन्या काळात राजवैभवात असलेले वाडे, राजवाडे नामशेष होताना पाहायला मिळत आहेत. ते उभारताना भौगोलिक परिसराचा अभ्यास करून इमारतीचा ढाचा, बारीक कलाकुसर करीत भव्य वाडे, राजवाडे उभारले जात होते. काळानुसार, बदलेल्या परिस्थितीनुसार त्यातील अनेक वास्तू नेस्तनाबूत झाल्या आहेत. अशाच एका वास्तुचे सागवानी लाकडाचे अवशेष एका भंगाराच्या दुकानात पाहायला मिळाले. त्यातील काही वस्तुंचे अवशेष भंगारात पाहायला मिळाले आहेत. संशोधन आणि संरक्षण ही पुरातत्त्व खात्याची अविभाज्य अंगे आहेत. पुरातत्त्व विभागाने असा अमूल्य ठेवा जतन करून संग्रहित केल्यास इतिहासासोबत कलाही जीवंत राहील. इतिहासाचे राजवैभव भंगारात जात असल्यामुळे संशोधनाच्या संधीलाही संशोधक मुकणार आहेत. भिंगार शहरालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानात सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वाड्याचे दरवाजे आणि खिडक्या, खांब, महिरप असलेल्या कमानी, कठडे, नक्षीकाम असलेल्या लाकडी पट्ट्या, लाकडी नक्षीदार छत, असे अनेक सागवान लाकडाचे अवशेष भंगारामध्ये पडलेले आहेत. या भंगार विक्रेत्यास त्या वाड्याबद्दल किंवा त्याच्या इतिहासबद्दल माहिती असण्याचे कारण नाही. त्या अवशेषामध्ये दहा बाय साडेपाच फुटाच्या सागवानी लाकडावर नक्षीकाम केलेले दार बरेच काही सांगून जाते. शत्रुला नेस्तनाबुत करणं हे तर युद्धात घडतेच. पण आक्रमकाकडून पराभूत राज्याची राजधानी नष्ट करणं किंवा राजवाडा जाळणं, हे अनेक वेळा घडलं आहे. अशा ठिकाणी आजघडीला केवळ अवशेष उरले आहेत. या अवशेषावरून त्या वैभवी काळाची कल्पना येते. काही ठिकाणी नव्यानं वास्तू उभारल्या गेल्या आहेत. अनेक वेळा वारसदाराची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अशा वास्तू विक्रीस निघाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु या इतिहासाची साक्ष देणार्या मौल्यवान वास्तुंचे जतन-संवर्धनाची जबाबदारी न घेतल्याने नामशेष होत आहेत. दोन वाडे पाडताना त्यातील एका वाड्याचे अवशेष विकत घेतले होते. जुन्या सागवानी वस्तू यापूर्वीही आणून विकलेल्या आहेत. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ग्राहक मिळाले नाहीत, तर ते जीवापाड जतन करून ठेवतो. -फारुक, भंगारविक्रेता गतकाळातील ही कलाकुसर अमूल्य ठेवा आहे. अशी कला आता पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. कलेच्या खजिन्याचे संवर्धन होणे, त्याचा संग्रह करणे गरजेचे आहे. इतिहासाची साक्ष देणार्या वास्तुचे अवशेष जर भंगारात पाहायला मिळत असतील तर भारतीय संस्कृती टिकण्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. -अशोकानंद महाराज कर्डिले, वारकरी संप्रदायातील अभ्यासक