त्याच्या डोळस प्रवासाची ‘लिम्का बुक’कडून दखल

By Admin | Updated: February 2, 2015 23:56 IST2015-02-02T22:09:09+5:302015-02-02T23:56:35+5:30

सातारा : मंद दृष्टी असतानाही निखील शेडगेने घेतली बी.टेकची पदवी

His eyes travel through 'Limca Book' | त्याच्या डोळस प्रवासाची ‘लिम्का बुक’कडून दखल

त्याच्या डोळस प्रवासाची ‘लिम्का बुक’कडून दखल

सातारा : निसर्गाची अवदृष्टी आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा यामुळे बालपणापासूनच लाभलेली मंद दृष्टी. मात्र, त्यावर मात करीत आत्मविश्वासाच्या बळावर शालेय जीवनात उज्ज्वल शैक्षणिक कामगिरी केलेल्या आणि मोठ्या जिद्दीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक पदवी संपादन करणाऱ्या साताऱ्यातील निखील प्रभाकर शेडगे या युवकाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’नेही दखल घेतली आहे. दोन्ही डोळ्यांच्या सदोष रेटिनामुळे दृष्टीत वैगुण्य असूनही तामजाईनगरमधील या निखीलने केलेल्या या कामगिरीने सातारकरांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशामुळे अल्पदृष्टी असून, हे यश मिळविणारा भारतातील तो पहिलाच उमेदवार ठरला आहे. या अनोख्या प्रवासाची कहाणी अशी की, वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच निखीलच्या डोळ्यात मोतिबिंंदू असल्याचे निदान झाले होते. त्यावरील उपचारासाठी ठिकठिकाणी त्याचे पालक त्याला घेऊन गेले. मात्र, त्यांना फारसे यश आले नाही. दिवसेंदिवस त्याची दृष्टी अधिकच अधू होऊ लागली. तिसरीत असतानाच एका नामवंत डॉक्टरकडून डोळ्यावरील शस्त्रक्रिया करताना रेटिनास इजा होऊन त्याला डावा डोळा कायमचा गमवावा लागला. मात्र, उजव्या डोळ्यातील लुकलुकत्या नेत्रज्योतींच्या प्रकाशात त्याने ज्ञानार्जन केले.मेडिकल एंटरान्समध्ये तो राज्यात सातवा आला. मात्र अधू दृष्टीमुळे त्याचा एमबीबीएससाठीचा प्रवेश होऊ शकला नाही. मात्र, अशा अडथळ्यांच्या शर्यतीने न डगमगता त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमास तोडीस तोड असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला. मुंबईतील माटुंगा येथे असलेल्या व्ही.जे.टी.आय. या महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे धडे गिरवले व पहिल्या सात सेमिस्टर यशस्वीपणे पार पाडल्या; परंतु लक्ष्य गाठण्याची त्याची मनिषा पूर्ण होण्यात अनेक गतिरोधक येत होते. त्यात भरीस भर म्हणून शेवटच्या सेमिस्टरवेळी गेल्या वर्षी त्याच्या उजव्या डोळ्यास रेटिनल डिटॅचमेंट उद्भवला. वारंवार झालेल्या शस्त्रक्रियांमुळे खरेतर कोणीही व्यक्ती वैतागली असती आणि मानसिक दृष्ट्या खचली असती. मात्र, हैद्राबाद येथील डॉ. पद्मजाकुमारी राणी यांनी निखीलवरील १५ वी शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यास नवसंजीवनीच दिली.या शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या त्रासांना सामोरे जात निखीलने ८ वी सेमिस्टरही पूर्ण केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी मेकॅनिकल इंजिनिअर होण्याचा आनंद मिळविला. त्याचे हे यश कौतुकास्पद असेच
आहे. (प्रतिनिधी)

यशाची घोडदौड कायम... - हत्तीखाना शाळेतील शिक्षिका सुरेखा शेडगे यांचा निखील हा मुलगा. त्याचे वडील कापडविक्री व्यवसायात आहेत. अथक प्रयत्नातून त्याने दहावीला त्याने ९२ टक्के गुण मिळविले व गुणवत्ता यादीत येण्याचा मानही मिळविला. या शिवाय विज्ञान, समाजशास्त्र विषयात प्रथम येऊन डॉ. धिरुभाई अंबानी अ‍ॅवॉर्ड आणि डॉ. जे. डब्लू आयरन पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला. १२ वीच्या बोर्ड परीक्षेतही विज्ञान शाखेतून त्याने यशाची घोडदौड कायम राखली.

Web Title: His eyes travel through 'Limca Book'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.