हिंगोली : 'इसिस'शी संबधित शिक्षकास एटीएसने घेतले ताब्यात
By Admin | Updated: August 8, 2016 12:39 IST2016-08-08T12:39:24+5:302016-08-08T12:39:50+5:30
'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसने हिंगोली येथून एका शिक्षकास ताब्यात घेतले.

हिंगोली : 'इसिस'शी संबधित शिक्षकास एटीएसने घेतले ताब्यात
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. ८ - एटीएसने आपल्या तपासात निष्पन्न होत असलेल्या नावांनुसार एकेकाला उचलणे सुरू केले आहे. परभणीचे इसिसचे धागेदोरे हिंगोलीपर्यंत पोहोचले असून आजम कॉलनी भागातील एका शिक्षकास सोमवारी पहाटेच्या सुमारास उचलले.
हिंगोली येथील जि.प.च्या शाळेवर उर्दू माध्यमाचा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रईसोद्दिन सिद्दीकी (३८) यास इसिसशी संबंध असल्यावरून उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. सिद्दीकी हा मूळ परभणीचा रहिवासी आहे. तो २00३ पासून हिंगोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पूर्वी तो औंढा येथे होता. मागील तीन वर्षांपासून हिंगोलीतील जि.प. उर्दू शाळेवर कार्यरत होता. येथील आजम कॉलनी भागात तो सलीम आॅटोवाला यांच्याकडे भाड्याने खोली घेवून राहात होता. मात्र त्याचे परभणीला जाणे-येणे सुरू असायचे. तो इतरांना प्रशिक्षित करीत होता, अशा संशयावरून त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.
एटीएसने अत्यंत गोपनियरीत्या ही कारवाई केली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर याची माहिती मिळत नाही. मात्र हिंगोलीतही इसिसचे परभणी कनेक्शन असल्याची वार्ता पसरल्याने खळबळ उडाली आहे.