हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र !
By Admin | Updated: August 18, 2014 11:16 IST2014-08-18T04:01:08+5:302014-08-18T11:16:25+5:30
हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे,’ या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ठाम आहेत.

हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र !
मुंबई : ‘हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे,’ या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ठाम आहेत. रविवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवात भागवत यांनी वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला.
यापूर्वी त्यांच्या या विधानावर देशभरात टीका झाली होती. त्यामुळे मुंबईच्या या कार्यक्रमात मोहन भागवत यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता होती. भागवत पुढे म्हणाले की, हिंदुत्व ही राष्ट्राची ओळख आहे. हिंदू धर्मात इतकी अंगभूत शक्ती आहे की, इतर संप्रदायांनाही तो सामील करून घेऊ शकतो. तसेच अस्पृश्यता संपवल्याशिवाय हिंदूंना गर्वाने हिंदू असल्याचे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वत:पासून आणि स्वत:च्या घरापासून याची सुरुवात केली, तर येत्या ५ वर्षांत प्रत्येक मंदिर,
पाणवठा आणि स्मशान हे सर्व हिंदूंसाठी खुले होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राममंदिर हा सन्मान - तोगडीया
‘अयोध्येमध्ये राममंदिर तयार होत नाही, तोपर्यंत हिंदंूना सन्मान मिळणार नाही,’ असे वादग्रस्त वक्तव्य विहिंपचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले. ते म्हणाले, ‘तत्काळ मंदिर उभारण्यासाठी परिषद काम करेल. शिवाय गोहत्या बंदीचा कायदाही लवकर तयार करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. अस्पृश्यता, गोहत्या आणि धर्मांतर बंद झाल्यावरच हिंदू आणि देश समृद्ध होईल.’