वस्त्यांनी पोखरला डोंगर; वन्यप्राणी झालेत बेघर !

By Admin | Updated: June 8, 2015 00:51 IST2015-06-07T23:22:41+5:302015-06-08T00:51:23+5:30

लोकवस्तीत वाढला वन्यजिवांचा वावर : कुसूर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले; ससे, कोल्हा, तरसासह पक्ष्यांनाही निवारा मिळेना

Hilly terrain; Wildlife is homeless! | वस्त्यांनी पोखरला डोंगर; वन्यप्राणी झालेत बेघर !

वस्त्यांनी पोखरला डोंगर; वन्यप्राणी झालेत बेघर !

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर, तारुखसह परिसरातील वाड्या-वस्त्या भौगोलिकदृष्ट्या पूर्णत: डोंगरी भागात डोंगरपायथ्यालगत वसल्या आहेत. परिणामी वन्य प्राण्यांचा वावर थेट लोकवस्तीपर्यंत होऊ लागल्याने पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर काही वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कुसूर, तारुखसह परिसरातील वाड्या-वस्त्या चारी बाजूंनी डोंगरी भागांनी वेढल्या गेल्या आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पूरक दुग्ध व्यवसायाची जोड असल्याने पाळीव जनावरांची संख्याही तुलनेत जास्त आहे. डोंगरी भाग असल्याने येथील शेतजमिनी अत्यल्प व चढ-उताराच्या कोरडवाहू आहेत. काही शेतकऱ्यांनी विहिरींच्या माध्यमातून बागायती शेती करण्याचा प्रयोग केला आहे. गावात जागा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच जनावरांसाठी कुड मातीचे शेड तयार करून वस्त्या तयार केल्या आहेत. दिवसभर शेतात थांबायचे आणि रात्रीचे मुक्कामाला गावात यायचे, असा शेतकऱ्यांचा दिनक्रम आहे.
शेती शिवाराला लागूनच घनदाट झाडीने व्यापलेले संपूर्ण डोंगरी वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. वन्य प्राण्यांना पोषक असे क्षेत्र असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. डुक्कर, वानर, कोल्हा आदी वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान केले जात आहे.
तर बिबट्या, लांडगा, कोल्हा, तरस यासारखे हिंस्त्र प्राणी शिवारापासून ते थेट लोकवस्तीमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ले करून फस्त करत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास वनविभागाकडून पंचनामा करून मदत दिली जात आहे. (वार्ताहर)


शेळी, मेंढपाळांची संख्या जास्त...
कुसूर, तारुख, कोळेवाडी येथे शेळी आणि मेंढपाळांची संख्या जास्त आहे. जनावरांना चरण्यासाठी डोंगर माथ्यावर शेतकऱ्यांच्या मालकीच्या पडजमिनी आहेत. यामध्ये मेंढपाळांसह पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. यावेळी अनेकदा वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले करून ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता लोकवस्तीमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. याची वनविभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कऱ्हाड तालुक्यात सर्वात मोठे वनविभागाचे कोळे बिट असून, येथे ९६० हेक्टर वनक्षेत्र आहे. या परिसरात लागून असलेले संपूर्ण वनक्षेत्र गर्द झाडाझुडपाने व्यापली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे सागवान झाडांची लागवड असलेले क्षेत्र म्हणून या भागाची ओळख आहे.

डोंगर पायथ्यलगतची गावे आणि लोकसंख्या
बामणवाडी, शिबेवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी : १ हजार ३७४
वानरवाडी, पवारवाडी - ६१५
तारुख, खडकवाडी -
२ हजार १७२
कोळेवाडी, शिंदेवाडी -
३ हजार १००
कुसूर - १८३३


डुक्कर, तरसांचाही वावर
वस्तीवरील अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, गाई-वासरे, कुत्री, म्हशीचे रेडकू आदी प्राणी मारले आहेत. वनक्षेत्रात बिबट्या, डुक्कर, साळींदर, वानर, ससे, तरस, कोल्हा आदी वन्य प्राण्यांसह विविध जातींच्या पक्षांची संख्या मोठी आहे.
बारमाही पाण्याचा स्त्रोत
या वनक्षेत्रात काही ठिकाणी बारमाही पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वनविभागकडून पाणवठे बांधण्यात आले आहेत.

वन्य प्राण्यांकडून शेतीचे बेसुमार नुकसान होते. भुईमुगाचे पीक घेणे सध्या जिकिरीचे झाले आहे. नुकसान झाल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळते, हे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. वनविभागाने त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
- बाबासाहेब पवार, शेतकरी (बामणवाडी)
आमचे जनावरांचे शेड डोंगर पायथ्याला आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी आम्हाला दररोज डोंगर पायथ्याच्या शेतात जावे लागते. मात्र, बिबट्याचा वावर वाढल्याने सध्या जनावरे पाळणेही नकोसे झाले आहे.
- बाबाजी खाडे,
शेतकरी, कसूर

Web Title: Hilly terrain; Wildlife is homeless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.