अपहरणाचा डाव फसला

By Admin | Updated: September 12, 2014 00:46 IST2014-09-12T00:46:37+5:302014-09-12T00:46:37+5:30

नागपूर येथील युग चांडक या चिमुकल्याचे अपहरण व खूनप्रकरण ताजे असतानाच उमरेड येथील एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास

Hijack | अपहरणाचा डाव फसला

अपहरणाचा डाव फसला

उमरेड येथील घटना : आरोपीने केली होती १० लाखांची मागणी
उमरेड : नागपूर येथील युग चांडक या चिमुकल्याचे अपहरण व खूनप्रकरण ताजे असतानाच उमरेड येथील एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरार नाट्याचा डाव एका तरुणाच्या हिमतीमुळे व अपहरण झालेल्या मुलाने वेळीच प्रसंगावधान बाळगल्याने फसला. दुसरीकडे, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत काही तासातच आरोपीला अटक केली. जयेश संजय सहजरामानी असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, भास्कर सतीश हेडावू (२०, रा. जोगीठाणा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला स्थानिक बौद्धविहाराजवळ उमरेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
जयेश सहजरामानी याच्या वडिलाचे इतवारी मुख्य मार्गावर जयदुर्गा सायकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल्स नामक दुकान आहे. जयेश वेकोलि येथील मॉडर्न स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकतो.
‘नागपूर का गुंडा हुं’
जयेश हा नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवन विकास चौकात स्कूलबसची प्रतीक्षा करीत होता. स्कूलबस येण्याआधीच आरोपी भास्करने डाव साधत चाकूचा धाक दाखवत जयेशला पकडले. लगेच जयेशचे वडील संजय सहजरामानी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘तुझा मुलगा किडनॅप झाला आहे, त्याच्याशी बोल’ असे म्हटले. अशातच जयेशने रडत रडतच ‘पप्पा मुझे बचाव’ म्हणताच जयेशचे वडील भांबावले. क्षणातच जयेशच्या हातातील मोबाईल आरोपीने हिसकला. ‘मैं नागपूरका गुंडा हुं. तुने मुझे पहचाना नही. दस लाख रुपये होना. नही तो तेरे बच्चे को खतम कर दुंगा. पुलीस को फोन मत करना’ अशा शब्दात धमकावले.
तरुण धावला मदतीला
हा प्रकार लक्षात येताच मोहसीन खान याने कोणताही विचार न करता भास्करला पकडले व त्याच्या कानशीलात हाणली. त्यातच जयेशला त्याचे आजोबा कुंदनदास हे घराकडे जात असताना दिसले. जयेशने ‘दादू’ अशी जोरात हाक मारताच आरोपी भास्कर घटनास्थळाहून पळाला. (प्रतिनिधी)
पुन्हा फोन वाजला
जयेश आजोबासोबत घरी पोहचताच कुटुंबीयांनी जयेशचे वडील संजय यांना फोन केला. मोबाईलवरच जयेशने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. मुलगा सुखरूप असल्याचे ध्यानात येताच. संजय लगेच घरी पोहचले. काही वेळातच आरोपी भास्करचा पुन्हा फोन आला. ‘तेरे लडके को मैने छोड दिया. अब मुझे पाच लाख रुपये की जरूरत है. नगर परिषद के पासवाले किल्ले पर रख देना’ असे म्हणत पोलिसांना सांगू नको, अशी बतावणीही त्याने केल्याचे संजय यांनी सांगितले. संजय यांनी सतर्कता बाळगत पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदविली.
पोलिसांची सतर्कता
पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी लगेच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. जयेशकडून व जीवन विकास चौकात काही नागरिकांकडून माहिती घेत पोलिसांनी काही तासातच भास्करला हुडकून काढत अटक केली. यात पोलीस शिपाई प्रदीप चौरे यांनी विशेष कामगिरी बजावली. सहायक पोलीस निरीक्षक एन. के. कराडे, शांताराम मुदमाळी, रोहन डाखोळे यांनीही सहकार्य केले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी भादंवि ३६४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Hijack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.