अधिक दरआकारणी पडणार महागात
By Admin | Updated: June 26, 2016 04:24 IST2016-06-26T04:24:31+5:302016-06-26T04:24:31+5:30
छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात वैध मापन शास्त्र विभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे.

अधिक दरआकारणी पडणार महागात
मुंबई : छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात वैध मापन शास्त्र विभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे. या विभागाने नुकत्याच हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २५६ आस्थापनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात ही मोहीम आॅनलाइन पद्धतीने अधिक सक्रिय करण्याचा या विभागाचा मानस आहे.
छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील विविध सिनेमागृहे, मॉल, रेल्वे व बस स्थानके, फूड मॉल, हॉटेल यांच्यावर वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई केली आहे. वैध मापन शास्त्र विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीमध्ये पॅकबंद पाण्याच्या बाटलीची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या २३३, छापील किमतीत खाडाखोड केल्याप्रकरणी ३, आवश्यक माहिती न छापणाऱ्या ९, विहित आकारमानात माहिती न दिलेल्या १ व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० अशा एकूण १५६ आस्थापनांवर कारवाई केली.
पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यंत्रणेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्यात विविध ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. (प्रतिनिधी)
कायदा काय सांगतो?
वैध मापन शास्त्र कायद्यानुसार कोणतीही वस्तू त्यावर छापलेल्या किमतीपेक्षा जादा दराने विक्री करता येत नाही. जर कोणी तसे करीत असेल, तर त्याच्यावर दंडात्मक, प्रसंगी शिक्षेची कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास प्रारंभी संबंधित विक्रेत्यावर ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तोच गुन्हा पुन्हा केल्यास दुप्पट दंडाची आकारणी होऊ शकते. त्यानंतरही जादा अधिभार आकारल्यास शिक्षादेखील होऊ शकते. ग्राहकाने पावती मागूनही न दिल्यास संबंधितांवर जादा अधिभार घेणे आणि पावती न देणे असे दोन गुन्हे दाखल होतात.
येथे करा तक्रार !
पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२-२२८८६६६६ आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकांवर तक्रार करता येईल.
सोशल मीडियावरही तक्रार करा
छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याच्या घटना आढळून आल्यास विभागाच्या ईमेल आयडीवर dclmms_comlaints@yahoo.com तसेच यंत्रणेच्या फेसबुक पेज (Legal Metrology Maharashtra Consumer grievances) या ठिकाणी तक्रार करा.
शीतपेयावर जादा अधिभार घेणे हे कायद्याच्या विरोधात आहे. विभागातर्फे नियमित तपासणी सुरू असली तरीही नागरिकांना असा प्रकार कोठे आढळल्यास त्याबाबत त्वरित संपर्क साधावा. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अमिताभ गुप्ता, वैध मापन शास्त्र नियंत्रक
छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरोधात ग्राहक पंचायत आणि वैध मापन शास्त्र विभागाने यापूर्वीही संयुक्त मोहीम राबविली होती. त्या माध्यमातूनही अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता ही मोहीम वैध मापन शास्त्र विभाग राबवित आहे. आणि ग्राहक पंचायतीद्वारे घेण्यात येणाऱ्या ग्राहक प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळांद्वारे याविषयी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येते. ग्राहक पंचायतीकडेही अशा प्रकारच्या तक्रारी येतात, त्या ग्राहकांना आम्ही वैध मापन शास्त्र विभागाकडे दाद मागण्यासाठी मार्गदर्शन करतो.
- अॅड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत