हायकोर्टाने टोचले शिक्षण संस्थांचे कान
By Admin | Updated: July 5, 2014 04:41 IST2014-07-05T04:41:11+5:302014-07-05T04:41:11+5:30
शिक्षण संस्थांचे कान टोचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतनश्रेणी पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत.

हायकोर्टाने टोचले शिक्षण संस्थांचे कान
मुंबई : राज्यातील खासगी आणि विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना अत्यल्प वेतन दिले जात असल्याबद्दल अशा शिक्षण संस्थांचे कान टोचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतनश्रेणी पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
अशा शाळांना शासन अनुदान देत नाही. तरीही या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनश्रेणीची पुनर्रचना करण्याचे काम राज्य शासनाने येत्या चार महिन्यांत करावे, असे निर्देश न्या. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व पुखराज बोरा यांनी दिले. भरमसाठ शुल्क आकारणी करणाऱ्या या शाळा शिक्षकांना नाममात्र वेतनावर राबवितात. या विरुद्ध बुलडाणा येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलच्या महादेव मोरे व इतर २२ शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी कायद्याच्या अनुसूची ‘सी’प्रमाणे वेतन देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी शिक्षण संचालक व उपसंचालकांना पत्र लिहिले होते, पण त्यांनी काहीच कारवाई केली नव्हती. यानंतर शाळा व्यवस्थापनाला पत्र लिहिले असता त्यांनी दर पाच वर्षांनी प्राथमिक शिक्षकांचे ५००, तर उच्च माध्यमिक शिक्षकांचे १००० रुपये वेतन वाढविण्याची तयारी दर्शविली होती. यावर समाधान न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.