कनावजेंच्या वीरमरणाला ‘जागा’ नाही
By Admin | Updated: November 24, 2014 23:05 IST2014-11-24T22:22:35+5:302014-11-24T23:05:17+5:30
स्मारकाची प्रतीक्षा : शासनाकडून शूर, लढवय्या सैनिकाची मृृत्यूनंतरही क्रूर चेष्टा

कनावजेंच्या वीरमरणाला ‘जागा’ नाही
कुवे : सैन्य दलात असताना शत्रूशी लढताना देशासाठी शहीद होणाऱ्या वीर जवानाचे लांजासारख्या शहरात एकही स्मारक नाही. देशासाठी छातीचा कोट करून आणि हृदय हातावर ठेवून लढणाऱ्या या प्रदीप कनावजे याच्या स्मारकाची लांजाला अद्याप प्रतीक्षाच आहे. लांजा तालुक्यात सैन्य दलामध्ये असणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. लांजा - कनावजेवाडी येथील राहणारा प्रदीप यशवंत कनावजे हा युवक १९८३ साली सैन्यदलामध्ये दाखल झाला होता. मराठी लाईफ इन्फन्ट्री या बटालियनमध्ये तो होता. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही तो सैन्यदलामध्ये दाखल झाला.
१९८३ला सैन्यदलात प्रथम स्पेशल रेकॉर्ड अशी वेगळ्या बटालियनमध्ये त्याची निवड झाली तेथून त्याने अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर काम करीत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. जम्मू काश्मीर या ठिकाणी अतिरेक्यांनी घेराव घातल्यामुळे अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्याने खुल्या मैदानात लढताना प्रदीप कनावजे या जवानाला वीरमरण प्राप्त झाले. ६ मार्च १९९७ हा दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.सैन्यदलामध्ये त्याने १४ वर्षे सेवा बजावत असताना अनेक पुरस्कारही प्राप्त केले होते. त्याच्या या पराक्रमाबद्दल त्याला दृढता व विरताही पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्याला अनेक पदके देण्यात आली होती. अशा या देशासाठी वीर अमरत्व पत्करणाऱ्या शहीद जवान प्रदीप कनावजे यांच्या नावाचे लांजा शहरात एकही स्मारक नसणे, ही मोठी खेदाची बाब आहे.
प्रदीप कनावजे शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषदेकडे या जवानाच्या स्मारकासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, लांजात या स्मारकासाठी कोठेही जागा नसल्याने अखेर लांजा कनावजेवाडी या रस्त्याला हुतात्मा प्रदीप यशवंत कनावजेमार्ग असे नाव देण्यात आले आहे.
देशासाठी लढणाऱ्या या वीर हुतात्मा प्रदीप कनावजे यांचे स्मारक असू नये, ही खेदाची बाब आहे. त्यांच्या स्मारकासाठी सरकारी कोट्यातूनही जागा उपलब्ध होत नाही. देशासाठी शहीद होणाऱ्या या जवानाच्या स्मारकाला जागा मिळत नसेल तर यासारखे मोठे दुर्दैव कुणाचे असणार. (वार्ताहर)