ठाण्यातही सुरू होणार साथरोग उपचार
By Admin | Updated: June 11, 2016 03:55 IST2016-06-11T03:55:25+5:302016-06-11T03:55:25+5:30
कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर येथेही साथरोग उपचार रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.

ठाण्यातही सुरू होणार साथरोग उपचार
ठाणे : ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर येथेही साथरोग उपचार रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील तसेच ठाणे जिल्ह्यातील साथरोग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात महापालिका क्षेत्रात साथरोग उपचार रुग्णालय उभारण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली होती. या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रात साथरोग उपचार रु ग्णालय उभारण्यासाठीचा प्रस्ताव जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणला जाईल, असे महापौरांनी सांगितले.
जिल्ह्याची लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास असून महापालिकेची लोकसंख्या २३ लाखांच्या आसपास आहे. महापालिकेतर्फे रु ग्णालय व आरोग्य केंद्रे कार्यान्वित केलेली आहेत. परंतु, साथरोग उपचारासाठी रुग्णालयाची उपलब्धता नसल्याने अशा रु ग्णांना मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे आता महापालिका कार्यक्षेत्रात १०० खाटांचे इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅण्डर्डच्या नियमानुसार अंदाजे एक लाख सात हजार क्षेत्रफळाचे रु ग्णालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक संसर्गजन्य रु ग्णासाठी स्वतंत्र कक्ष, किमान २० खाटांचा आयसीयू कक्ष निर्माण करण्यासाठी पाच कोटींची तरतूद, लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू कक्षासाठी पाच कोटी, आयसीयू कक्षामध्ये पीएफटी मशीन, मेडिकल फर्निचर, व्हेंटिलेटर्स, आयसीयू मॉनिटर्स, डिफ्रिलेटर, पल्स आॅक्सिमीटर, इनफ्युशन पंप, इसीजी मशीन, डिजिटल एक्स-रे मशीन, पोर्टेबल मशीन, सोनोग्राफी यंत्र आदी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक प्रयोगशाळा, आॅटोक्लेव व लॉण्ड्री सेक्शन आदी सेवा-सुविधाही तेथे असतील. यासाठी अंदाजे ३७.०५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच या रुग्णालयामध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स व स्टाफ नियुक्त होणार असून यासाठी वार्षिक अंदाजे सात कोटी ६० लक्ष इतका खर्च होणार आहे.
खारेगावात जागा देणार
या रु ग्णालयासाठी मौजे खारेगाव येथील अंदाजे चार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा लाभ ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई, वसई-विरार आदी महापालिका कार्यक्षेत्रांतील, तर डहाणू, शहापूर, मोखाडा, वाडा या आदिवासी तालुक्यांतील नागरिकांना होणार आहे. रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळावे, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.