मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात; ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:49 IST2017-09-19T14:44:54+5:302017-09-19T14:49:07+5:30
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात; ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू
मुंबई, दि. 19- मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरं तर सकाळपासून पावसाचं वातावरण नव्हतं. मात्र दुपारी 2 च्या सुमारास अंधारून आल्यावर येऊन पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला. तसंच कांदिवली, बोरीवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. तसंच विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. साकीनाका भागातही पावसाने हजेरी लावली असून पवई, कांजूरमार्ग भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे.
दरम्यान, येत्या 72 तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातही दमदार पाऊस सुरु आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे.
सिंधुदुर्गात पावसाचा कहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आल्यानं माणगाव खोर्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनाही या पाण्यामुळे खोळंबून राहावं लागलं आहे. मंगळवारी माणगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे तुफान पावसाचा अनेकांना फटका बसला आहे.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावर असणा-या गावातील लोकांची पळापळ झाली आहे. कुडाळ-आंबेडकर नगरमध्ये पुराचे पाणी शिरले असून काळसे बागवाडी पाण्याखाली गेली आहे. मालवण तालुक्यातील बागायत, मसुरे-कावा भागात पूरजन्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्ग ठप्प झाले आहेत.
रत्नागिरी व रायगडला अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. येत्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याला सलग दुस-या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना त्यांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.