लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात २१ ऑगस्टपर्यंत पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून १५ ते १६ जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधला, यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
नांदेड विभागात २०६ मिमी इतका ढगफुटीसदृश पाऊस झाला असून तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफसह आता सैन्यदलाला देखील पाचारण केले आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ६ नंतरच्या सहा तासात १७० मिमी पाऊस झाला. मुंबईत मंगळवारी चार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. ज्या भागात रेड अलर्ट आहे, तेथील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.मुंबईत पावसाच्या तडाख्याने लोकल उशिराने धावत होत्या. मेट्रो सेवा मात्र सुरळीत होती. मुंबईकरांना भविष्यात मेट्रोच्या रूपाने सुकर प्रवास मिळेल, हे यातून दिसल्याचे फडणवीस म्हणाले.
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’
मुंबई : रेल्वेसह रस्ते वाहतुकीला ब्रेक लावणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत केले. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह मध्य आणि हार्बरवर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते, लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल पाऊण तास उशिराने धावत असल्याने चाकरमानी स्टेशनावर अडकून पडले.
पालघरमध्ये नद्या फुगल्या
पालघर : गेल्या चार दिवसांपासून अर्थात शुक्रवार सकाळपासून जिल्ह्यात वसई-विरार वगळता उर्वरित ठिकाणी रिपरिप सुरू असणारा पाऊस सोमवार सकाळपासून सर्वत्र दमदार सुरू झाला. अनेक धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून नद्या ही धोका पातळी जवळ पोहोचल्या आहेत.
नुकसान भरपाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
- घरांचे नुकसान, माणसे, पशुधनाचे मृत्यू याबाबत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे, तसेच तेथील लोकांना जेवण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
- मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. पुढचे तीन दिवस बीड, लातूर, नांदेडमध्ये पूरस्थितीची शक्यता आहे. मुखेड भागात २०६ मिमी पाऊस झाला असून पाच लोक बेपत्ता आहेत.
- तसेच १५० पेक्षा जास्त जनावरे मृत अथवा वाहून गेली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामधील तीन जिल्ह्यांचा विचार केला तर ८०० गावे बाधित असून एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
- कोकणात जगबुडी, अंबा, कुंडलिका या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये पूर असल्याने त्यावरही लक्ष आहे. कोल्हापूर, सातारा घाट विभागात रेड अलर्ट आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.